खंडित होणाऱ्या व कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने त्रस्त भालावल ग्रामस्थ करणार १५ मार्च पासून बेमुदत उपोषण

उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांना दिले तक्रारींसह उपोषणाचे निवेदन

सावंतवाडी,दि.२८ फेब्रुवारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे महावितरणच्या अरेरावी, चुकीची धोरणे व कामात केली जाणारी दिरंगाईमुळे जिल्ह्यातील नागरिकांना होणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून महावितरणच्या जुनाट वायर, जुनी उपकरणे, मोडकळीस आलेले पोल, इतिहासकालीन ट्रान्सफॉर्मर आदींमुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक गावातील लघुउद्योग, शेती व्यवसाय यांचे अतोनात नुकसान होत आहे.

सावंतवाडी तालुक्यातील भालावल येथे २०२२/२३ मध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देखील तेथील शेतकऱ्यांना शेतासाठी पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. शेती पंप चालविण्यासाठी विजेचा दाब कमी पडतो. कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने वारंवार वीज खंडित होते. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे, उदरनिर्वाहसाठी केला जाणारा भाजीपाला, आदी आंतरपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. पर्यायाने भालावल ग्रामस्थांनी सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी यांना सदोष ट्रानसफॉर्मर बसवून कामात कसूर केलेल्या महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी व ६३ केव्ही ट्रान्सफॉर्मर बदलून १०० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यासाठी दिनांक १५ मार्च २०२४ पासून उपोषणाला बसत असल्याचे निवेदन दिले आहे.
सन २०२२/२३ मध्ये जिल्हा नियोजनच्या निधीमधून भालावल (कांगलीचे भरड) येथे ६३ केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आलेला असून सदर ट्रान्सफॉर्मर बसविताना महावितरणचे अधिकारी व ठेकेदाराने संगनमताने कमी दर्जाचे साहित्य वापरून ग्रामस्थांची फसवणूक केलेली असल्याचा संशय भालावल ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे .सदर ट्रान्सफॉर्मर वरून भालावल येथील कांगलीचे भरड ग्रामस्थांना शेतीपंपासाठी होणारा वीज पुरवठा कमी दाबाने होत असल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार गेले वर्षभर सुरू आहेत व सदरच्या ट्रान्सफॉर्मर वरून वीज पुरवठा होऊनही शेती पंप चालत नसल्याने गावातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेती, भाजीपाला आदी आंतरपीके पाण्याविना जळून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. परंतु याच ट्रान्सफॉर्मर वरून परप्रांतीय असलेल्या केरळीयन शेतकऱ्यांशी संगणमत करून त्यांच्या शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा होत असून भालावल येथील स्थानिक शेतकऱ्यांना मात्र खंडित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागत असल्याचे मत देखील भालावल ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. सदरच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे होणारे शेतीचे नुकसान महावितरणने भरून द्यावे अशी मागणी देखील निवेदनाद्वारे भालावल ग्रामस्थांनी केली आहे. सदर ठिकाणी बसविलेला २०२२/२३ मधील ६३ केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बदलून महावितरणने त्या ठिकाणी १०० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून द्यावा आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी भालावल ग्रामस्थांनी केली आहे.
महावितरण गावागावातील कमी दाबाने वीज पुरवठा होणाऱ्या वीज ग्राहकांना वारंवार जिल्हा नियोजन मधून ट्रान्सफॉर्मरसाठी निधी मंजूर करून आणण्याचे सांगत आहे. परंतु महावितरण हे स्वतंत्र महामंडळ असून जिल्हा परिषद मधून ग्रामस्थांनी निधी आणण्याचा किंवा जिल्हा परिषदने महावितरणला निधी देण्याचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. जिल्हा परिषदकडे निधी मागण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. कारण महावितरण वीज बिलांचे शुल्क स्वतंत्रपणे वसूल करते, जिल्हा परिषद कार्यालय, शाळा आदींचे वीज बिल सुद्धा वसूल करून घेते. तरीही जिल्हा नियोजनाचा निधी मागून लोकांची दिशाभूल तर करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महावितरणने वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करणे हे महावितरणचे कर्तव्य आहे. पावसाळ्यात शेती पंप बंद असतात. शेतीपंपांचा वीज पुरवठा महावितरण स्वतः बंद करते, परंतु बंद असलेल्या कालावधीचे विज बिल मात्र शेतकऱ्यांना आकारले जाते व वीज बिल न भरल्यास त्यावर दंडाचा अधिभार देखील लावला जातो. अशा प्रकारे महावितरणकडून होणारी लूट थांबवून वीज ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याला जबाबदार कोण..?? असा प्रश्न उपस्थित करत सदरच्या खंडित वीज पुरवठ्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अशी मागणी भालावल ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांचेकडे केली आहे.
महावितरणकडून वीज ग्राहकांवर वारंवार होणारा अन्याय आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेली आहे. संघटना देखील अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी उपोषण, निवेदने देऊन महावितरणचा कारभार सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. त्यामुळे भालावल ग्रामस्थांनी केलेल्या उठावाला आणि त्यांच्या उपोषणाला तालुक्यातील इतर गावागावातील ग्रामपंचायत कडून देखील सहकार्य मिळण्याची शक्यता जास्त असल्याने महावितरणने वेळीच सदर बाबीवर तोडगा काढून भालावल (कांगलीचे भरड) येथील ट्रान्सफॉर्मर बदलून देत ग्रामस्थांची मागणी मान्य करावी. अन्यथा वीज ग्राहकांचा होणारा उद्रेक नक्कीच महावितरण अधिकाऱ्यांना भविष्यात जिल्ह्यात काम करण्यासाठी कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावागावात सुरू होणारे उठाव भविष्यात महावितरणला योग्य प्रकारे काम करण्यास भाग पाडतील अशी देखील आशा वाटू लागली आहे.
सदरच्या निवेदनाची प्रत भालावल ग्रामस्थांनी सावंतवाडीचे आमदार व शालेय शिक्षण तथा मराठी भाषामंत्री नाम. दीपक केसरकर, नाम.रवींद्र चव्हाण, पालकमंत्री सिंधुदुर्ग, उपकार्यकारी अभियंता सावंतवाडी, अधीक्षक अभियंता, महावितरण कुडाळ, वीज ग्राहक संघटना, तालुका सावंतवाडी व पोलीस निरीक्षक सावंतवाडी यांना माहितीस्तव सादर केली आहे.