मालवण,दि.१३ जानेवारी
ज्यावेळी तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन विसरता, त्यावेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सुत्रे दुसऱ्यांच्या हातात देता व परावलंबी बनता. पण ज्यावेळी तुम्ही जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारता, त्यावेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सुत्रे स्वतःच्या हातात घेता आणि स्वावलंबी बनता. कारण तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन एक नवीन जाणीव आणि नवीन दिशा प्राप्त करून देतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले.
मुंबई विद्यापीठ संलग्नित कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या मुलांचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबीर साळेल ग्रामसचिवालय येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिरात समन्वयकांनी मुलांसाठी बौद्धिक चर्चासत्राचे आयोजन केले होते. यातील एक चर्चासत्र ‘तरुणाई अन् अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन’ याविषयावर विजय चौकेकर हे बोलत होते. जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग पीआयएमसी आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी विचारमंचावर कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. एच. एम. चौघुले, प्रा. पी. बी. खरात, विद्यार्थी प्रतिनिधी चैताली कुणकवळेकर, गीतेश वळंजू कृष्णा दळवी, रिना मराळ आदी उपस्थित होते.
विजय चौकेकर म्हणाले, आपल्यात दैवी शक्ती आहे, मी कुणाचा तरी अवतार आहे, असे सांगून जादूटोणा करून सर्वसामान्यांची फसवणूक करणारे भोंदूबाबा कसे हातचलाखीने चमत्कार करतात, विविध रासायनिक संयुगाचे प्रयोग करून कसे फसवितात, याची विविध प्रात्यक्षिके मुलांना करून दाखविली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर यांचे परिवर्तनवादी अभंग व विचार कथन केले.