मराठीचा अभिमान असायलाच हवा – अॅड.परूळेकर

वेंगुर्ला,दि.२८ फेब्रुवारी

कवी कुसुमाग्रज हे सर्वात श्रेष्ठ प्रतिभावंत कवी आहेत. तसेच ते एक उत्तम नाटककार, कथा लेखक आणि समिक्षक होते. आपणास मराठीचा अभिमान असायलाच हवा. मराठी माध्यमातून शिकणा-या मुलांचे इंग्रजीवरही प्रभूत्व असू शकते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ऐसी अक्षरे रसिके मेळविन‘ असे म्हटले असल्याचे संत साहित्याचे अभ्यासक अॅड.देवदत्त परूळेकर यांनी सांगितले.

नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे सादरीकरण केले. यात अस्मिता दाभोलकर, वैष्णवी पडवळ, जान्हवी माणगांवकर, जिज्ञासा पाटील, वैष्णवी न्हावी, दीशा कोनकर, यामिनी शेळके, दुर्वा गांवकर, जान्हवी बांदवलकर, साध्वी मिढे, कशिश हळदणकर, प्रिती परब, जेन्सिया डिसोजा, रिचिता बोवलेकर, रिया पुराणिक, पारस केरकर, धनश्री निकम, सानिया साठी, चैत्रा गावडे यांनी काव्यवाचन, समुहगीत गायन व समुह नृत्य सादर केले. पाटकर हायस्कूलमधील मुलांना प्रा.महेश बोवलेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कविता सादर करताना त्या कवितेतील आशय आणि विषय आपल्या सादरीकरणातून व्यक्त झाला पाहिजे असे मत कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी मांडले. तर कार्यवाह कैवल्य पवार यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याविषयी व मराठी भाषा गौरव दिनाबद्दल माहिती दिली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे श्रीराम मंत्री यांचे ‘वेंगुर्ला बोली आठवणीतील म्हणी आणि हुमाणी‘ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.

सूत्रसंचालन प्रा. महेश बोवलेकर यांनी केले. यावेळी संस्थेच्या उपकार्यवाह माया परब, नंदन वेंगुर्लेकर, तुषार कामत, मेहंदी बोवलेकर यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.