मालवण,दि.२८ फेब्रुवारी
शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली असून मांजरेकर हे आता शिवसेनेच्या कोणत्याही पदावर राहणार नाहीत, ते केवळ शिवसैनिक म्हणून कार्यरत राहतील, असा सर्वानुमते ठराव शिवसेनेच्या मालवण तालुका व शहर कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील हॉटेल रामेश्वर मध्ये शिवसेना मालवण तालुका व शहर कार्यकारिणीची बैठक पार पाडली. यावेळी शिवसेनेचे मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, तालुकाप्रमुख महेश राणे, उपतालुकाप्रमुख पराग खोत, शहरप्रमुख बाळू नाटेकर, महिला उपाजिल्हाप्रमुख निलम शिंदे, महिला तालुकाप्रमुख आशा वळपी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राजा गावकर म्हणाले, किसन मांजरेकर यांच्या विरोधात शिवसेनेतील तालुका व शहर पदाधिकारी यांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली आहे. ते आता शिवसेनेच्या कोणत्याही पदावर राहणार नाहीत. तसेच त्यांनी तालुक्यातील जबाबदार पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणाच्याही विरोधात किंवा बाजूने कोणतीही बातमी वृत्तपत्रात देऊ नये. तसेच शिवसेनेच्या मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाच्या कामात कोणतीही ढवळाढवळ करू नये, असा ठराव आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्यास सूचक – उल्हास तांडेल व अनुमोदन नीलम शिंदे व बबन शिंदे यांनी देत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या सर्वानुमते हा ठराव घेण्यात आला, यापुढे मांजरेकर हे केवळ एक शिवसैनिक म्हणून कार्यरत राहतील, असेही राजा गावकर म्हणाले.