मालवण,दि.२८ फेब्रुवारी
येत्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचाच दावा राहणार असून या मतदार संघात शिवसेनेच्या किरण सामंत यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी आमची भूमिका आहे. आमची महायुती असून शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे असल्याने शिवसेना उमेदवाराचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शिंदे शिवसेना गटाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मालवण येथील सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाची पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, शहर प्रमुख बाळू नाटेकर, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बबन शिंदे म्हणाले, लोकसभेच्या यापूर्वी झालेल्या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे आहे. त्यामुळे या मतदार संघातील उमेदवारीवर शिवसेनेचाच दावा राहणार आहे. मतदार संघाचे उमेदवार हे किरण सामंतच असावेत अशी आमची सर्वांचीच आग्रही भूमिका आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मतदार संघात शिवसेनेचाच उमेदवार देतील याची खात्री आहे. किरण सामंत यांचे कार्य मोठे असल्याने त्यांचाच विजय निश्चित आहे, असा विश्वासही श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.
याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून राज्यभरात काम करत असून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे, असेही बबन शिंदे म्हणाले.
राजा गावकर म्हणाले, कोकणात शिवसेनेला महत्व आहे. वरिष्ठ जो उमेदवार देतील त्याला निवडून आणणे हे भाग असले तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदार संघ शिवसेनेचा असल्याने उमेदवार शिवसेनेचा असावा ही आमची आग्रही मागणी आहे. या मतदार संघात किरण सामंत यांचे कार्य असल्याने तेच विरोधी पक्षाच्या उमेदवाराला कडवी लढत देऊ शकतात. त्यामुळे या मतदार संघाची उमेदवारी ही सामंत यांनाच मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. महायुती म्हणून त्यांच्या मोठ्या विजयासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, असेही गावकर यांनी स्पष्ट केले.