आरोग्य विभागाची नवीन इमारत जुन्या पंचायतीच्या जागेत बांधण्यात येणार

सावंतवाडी ,दि. २८ फेब्रुवारी
जिल्हा परिषद सावंतवाडी तालुका आरोग्य विभाग आता कात टाकणार असून अनेक वर्षे उपजिल्हा रूग्णालयात बसवलेले बस्तान आता नव्या जागेत हलविणार आहे.आरोग्य विभागाची नवीन इमारत जुन्या पंचायतीच्या जागेत बांधण्यात येणार आहे .त्यासाठी एक कोटींचा निधीही प्राप्त झाला असून निविदा प्रकिया ही पूर्ण झाली आहे.लवकरच बांधकामाला सुरूवात होणार आहे.

सावंतवाडी तालुका आरोग्य विभाग हा गेली अनेक वर्षे उपजिल्हा रुग्णालयात होता.तेथूनच संपूर्ण तालुक्याचा कारभार हाकत होते.येथे सुविधांचाही अभाव होता. त्यामुळे अनेक वर्षे तालुका आरोग्य विभागाला नव्या जागेची प्रतिक्षा होती.पण याला मुहूर्त मिळत नव्हता तसेच शासनाकडून पुरेसा निधी ही मिळत नव्हता मात्र यावर्षी तालुका आरोग्य विभाग आता स्वःताच्या जागेत जाणार आहे.या साठी एनआरएचएम मधून एक कोटिचा निधी आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे.
या एक कोटी रूपया मधून ही अद्यावत अशी इमारत बांधण्यात येणार आहे.त्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न ही मिटला असून सावंतवाडी पंचायत समितीची जुनी इमारत असलेल्या ठिकाणी तीन गुंठे जागा ही तालुका आरोग्य विभागाला देण्यात आली असून या जागेत अद्ययावत अशी इमारत तसेच पार्किंग ची व्यवस्था ही करण्यात आली आहे.

या इमारतीचे लवकरच भूमिपूजन होणार आहे.
एक कोटी रूपये एनआरएचएम कडून प्राप्त झाल्यानंतर त्यांची निविदा प्रकिया ही पूर्ण करण्यात आली आहे.त्यामुळे आता लवकरच भूमिपूजन कार्यक्रम होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.
याबाबत गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांना विचारले असता त्यांनी ही तालुका आरोग्य विभागासाठी जुन्या पंचायत समिती ची इमारत परिसरातील तीन गुंठे जागा देण्यात आली असून या जागेत ही इमारत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.