शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग,दि.२८ फेब्रुवारी

समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित असून मागासवर्गीय विद्याव्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सन 2023-24 या वर्षात भारत सरकार शिष्यवृती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यवसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळ दिनांक 11 ऑक्टोबरपासून कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तथापि, सन 2023-24 करिता शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून अल्प प्रमाणात प्राप्त झाले आहेत.

तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असणाऱ्या अर्जाची तात्काळ छाननी करुन परिपूर्ण पात्र अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून कार्यालयस्तरावर वर्ग करण्याची कार्यवाही महाविद्यालयांनी करावी, महाविद्यालयस्तरावरील अर्ज विहीत कालावधीत जिल्हास्तरावर वर्ग झाले नाहीत व त्यामुळे अर्ज ऑटो रिजेक्ट होवून विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील, असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.