सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा विजयदुर्ग खाडीवरील मणचे – तारळ पूल लवकरात लवकर होण्यासाठी माजी आमदार प्रमोद जठार प्रयत्नशील

0

देवगड,दि.१३ जानेवारी
सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आणि येथील जवळपास २० ते २५ गावांना फायदा होणारा
विजयदुर्ग खाडीवरील मणचे तारळ पूल व्हावा अशी येथील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याबाबत पाळेकरवाडी
सरपंचांनी माजी आमदार प्रमोद जठार यांना निवेदन दिले आहे. या पुलामुळे देवगड तालुक्यातील मुटाट, पाळेकरवाडी,
वाघोटण, मालपे, मणचे, पोंभूर्ले, कोर्ले, धालवली, मोंड, नाडण, कुणकवण, पाटगाव, पेंढरी, बापर्डे या गावांना तसेच राजापूर
तालुक़्यातीलही अनेक गावांना याचा फायदा होणार आहे. सदर पूल व्हावा यासाठी यापूर्वी अनेकांनी प्रयत्न केले आहेत.
स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांनीही या पुलासाठी प्रयत्न केले होते. सदर पूलाच्या मंजूरीला गती मिळावी यासाठी माजी
आमदार प्रमोद जठार यांनी पुढाकार घेतला असून याबाबत सदर काम राज्याच्या येत्या अर्थसंकल्पीय कामांमध्ये सामाविष्ट
करुन त्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे करणार असून
त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागमार्फत बजेट प्लेट तयार करुन योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे जठार यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे दोन महत्वाचे जिल्हे असून या जिल्ह्यांना
जोडणारा या भागामध्ये सध्या आंबेरी पूल आहे. मात्र मणचे मुटाट या गावांपासून आंबेरी पुलाचे अंतर ३० ते ३५ किमी आहे.
त्यामुळे या भागातील जनतेला आंबेरी पुलाचा म्हणावा तसा फायदा होत नाही. तसेच मणचे मुटाट या पंचक्रोशीमध्ये
राहणाऱ्या जनतेचा व्यवसाय आंबा व्यवसाय आहे. येथील बहुतांश आंबा हा मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये जातो. याठिकाणी
पूल झाल्यास त्याचा फायदा आंबा बागायतदारांनाही मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच विजयदुर्ग हे पर्यटनस्थळ म्हणून
नावारुपास येत असून पर्यटकांसाठीही या पुलाचा फायदा होणार आहे. त्यामुळे या पुलाचे महत्व सरकारला पटवून देऊन
लवकरात लवकर या पुलाला मंजूरी मिळून निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण मंत्री महोदयांची लवकरच भेट घेऊन त्यांना
साकडे घालणार असल्याचे प्रमोद जठार यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.