कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या प्रमोशनची चौकशी व्हावी ..

आमच्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय लवकरच ; रेल्वस्थानक विकासाचे टेंडरची लोकायुक्तांकडे तक्रार करणार..

कणकवली दि.२८ फेब्रुवारी(भगवान लोके)

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे अनेक ठिकाणी जात स्वतःचे सत्कार करुन घेत आहेत,त्या संस्थांना आर्थिक मदत देवून सत्कार घडवून आणत आहेत.रेल्वस्थानक विकासाचे टेंडरची लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहे.कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या प्रमोशनची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती माजी आ.परशुराम उपरकर यांनी दिली. आमच्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय शिवसेना किंवा राष्ट्रवादी हा काही दिवसातच घेतला जाईल,असेही त्यांनी सांगितले.

कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी स्वतःला अधिकार नसताना अधीक्षक अभियंता यांच्या अधिकारातील रेल्वे सुशोभीकरण कामे सर्वगोड यांनी उघडली.त्यांनी रेल्वे स्टेशन विकसित करायचे टेंडर पूर्वी दोस्ती असलेल्या पनवेल येथील ठेकेदारांना काम दिले.त्याच्याकडून पोट ठेकेदार म्हणून कणकवली येथील एका लाडक्या ठेकेदाराला हे काम दिल्याचा आरोप श्री.उपरकर यांनी केला.

कणकवली रेल्वे स्टेशन विकसित करताना चुकीच्या पद्धतीने काम केले जात आहे.आता चाकरमानी येणार आहेत, त्यांचे हाल होणार आहेत.वृध्द आणि अपंग असेल तर व्हीलचेअर किंवा वाहन जावू शकत नाही.अनेक प्रवाशांना त्यांचा तोटा होणार आहे.आता रेल्वे स्टेशन कडे जाण्या येण्यासाठी रस्ता नाही. त्याचा फटका आगणेवाडी यात्रेसाठी येणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.श्री.सर्वगोड हे आठवड्यातील चार दिवस मंत्रालयात असतात आणि शनिवारी, रविवारी काम करत असल्याची जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका परशुराम उपरकर यांनी केली.

राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा पर्याय निवडणार…

माझ्या सहित कार्यकर्त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून विचारणा करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राच्या सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आमच्या समोर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे दोन पर्याय आहेत.आता अधिवेशन संपल्यानंतर आमचा निर्णय अंतिम होईल. भाजपकडून अद्यापही विचारणा झालेली नाही किंवा आम्हीही भाजपमध्ये जाण्याच्या विचारात नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.