जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे होणार सुरक्षित
मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांचे महत्वपूर्ण पाऊल
मुंबई,दि. १३ ऑक्टोबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ले हद्दीतील समुद्र किनाऱ्यावर राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने अत्याधुनिक एआयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे उपस्थितीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई येथे बैठक पार पडली.
सदर पोलीस ठाणे हद्दीतील विविध बंदर व जेटी वरील जहाजांवर अनेक परप्रांतीय कामगार कामकाजाकरिता असतात. त्यामुळे बंदर परिसरातील हद्दीत संशयीत दहशतवादी व गुन्हेगार लपून बसण्याची शक्यता असल्याने सागरी सुरक्षेस धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर देवगड, मालवण आणि वेंगुर्ले पोलीस ठाणे परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत एआय युक्त सीसीटीव्ही सर्वेलन्स यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी देवगड पोलीस ठाणे येथे ४,५९,९५,८३५ रुपये, आचरा पोलीस ठाणे ३,७४,६३,६१३ रुपये, विजयदुर्ग पोलीस ठाणे २,८७,९८,१२१ रुपये, मालवण पोलीस ठाणे ४,५८,७७,७८३ रुपये, निवती पोलीस ठाणे ४,४६,२३,६८० रुपये आणि वेंगुर्ला पोलीस ठाणे ४,५५,४७,१३६ रुपये, एवढी अंदाजे रक्कम अपेक्षित आहे.
दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षेची बाब लक्षात घेता संबंधित पोलीस ठाणे हद्दीत लवकरात लवकर कॅमेरे बसवण्याच्या सूचना या बैठकीत संबंधितांना दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर एकूण 92 लँडिंग पॉईंट्स असून या सर्व ठिकाणी पोलिस यंत्रणा अथवा सुरक्षा दल अधिकारी ठेवणे शक्य नाही. अशा ठिकाणी बंदर व जेटी वरील जहाजांवर अनेक परप्रांतीय कामगार कामकाजाच्या दृष्टीने येत असतात. त्यातून समाज विघातक व संशयित दहशतवादी गुन्हेगार आदी येऊन लपून बसण्याची व राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त सीसीटीव्ही सर्वेलन्स यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठकीत दिली.


