कर्तव्यदक्ष उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी अधिकाऱ्यांसह थेट बांधावर जाऊन केली पाहणी
सावंतवाडी,दि.१४ ऑक्टोबर
न्हावेली गावात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पिके खाली पडून त्यांना कोंब फुटल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी ही बाब ग्रामपंचायत उपसरपंच अक्षय पार्सेकर यांना कळवताच त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत तलाठी कोमल धांदे आणि कृषी अधिकारी प्रियांका सावंत यांना सोबत घेऊन थेट शेतबांधावर भेट दिली. त्यांनी भातशेतीची पाहणी करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.
या वेळी नुकसानग्रस्त शेतकरी प्रकाश धाऊस्कर, तुकाराम पार्सेकर तसेच ग्रामपंचायत सदस्या आरती माळकर उपस्थित होत्या. अधिकाऱ्यांनी भातपिकाच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेत शेतकऱ्यांना शासनाच्या आपत्ती अनुदान योजनेंतर्गत नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे.
शेतकऱ्यांनी वेळेवर मदत मिळावी आणि पुढील हंगामासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


