मराठा समाजाचा द्वेष करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

कणकवलीत मराठा समाज नेत्यांची केला शिंदे फडणवीस सरकारचा निषेध ;सिंधुदुर्गातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी

कणकवली दि.२९ फेब्रुवारी(भगवान लोके)

मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले.या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचा वाढता पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांना मिळत असल्याचा पोटशूळ देवेंद्र फडणवीस यांना उठला आहे.त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तातडीने एसआयटी चौकशी लावली आहे,मात्र,मंत्रीपदावर राहून भुजबळ मराठा समाजाच्या नेत्यांवर टीका करत आहेत,त्यांची चौकशी लावली नाही. नितेश राणे आणि नारायण राणे यांनी देखील मराठा समाज ९६ कुळीचा मुद्दा पुढे आणून आरक्षणाच्या मुद्यावर चुकीची भूमिका घेतली.आता शिंदे -फडणवीस सरकारने डीएड भरतीबाबत जीआर काढला,एकीकडे मराठा आरक्षण दिल्याशिवाय भरती करणार नाही असे सांगितले.आता सरकारी भरती करण्याचा जीआर काढत मराठा समाजाच्या मुलांवर अन्याय केला,त्याबद्दल या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो.असे प्रतिपादन मराठा समाज नेते सतीश सावंत,सुशांत नाईक,सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष राजू रावराणे यांनी केले.

कणकवली येथील मराठा मंडळ येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मराठा समाजाचे संतोष परब, अनुप वारंग, सिद्धेश राणे, भाई साटम, चंदू परब, मंगेश सावंत, रोहित राणे, सचिन राणे, सुशील राऊळ, सागर राणे, रुपेश आमडोसकर, शरद सरंगले, सुहास राणे, रुपेश राणे, अनंत राणे, अमोल साटम, रविंद्र राणे, अजय सावंत, अरुण सावंत आदी मराठा बांधव उपस्थित होते.

सतीश सावंत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजाला त्रास दिला जात आहे.मराठा आंदोलनामुळे पोटशूळ फडणवीस यांना झालेला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे.भुजबळ ज्या पद्धतीने बोलत आहेत त्याबाबत त्यांची चौकशी फडणवीस सरकारने केली नाही.२०१८ साली सदावर्ते यांनी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही याचिका दाखल केली. तेही फडणवीस यांचेच हस्तक आहेत.खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचे मारेकरी हे फडणवीस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भरती करणार नाही,असे सांगत फसवणूक केली आहे.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी भरती करण्याचा जीआर काढला आहे.शासकीय भरतीत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. जे दीपक केसरकर मराठा समाजाच्या मतदानावर निवडून आले त्यांनी हा जीआर काढून समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला.

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील लढत असताना खोटे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवणूक केली आहे.मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेला मराठा समाजाचा पाठिंबा पाहून देवेंद्र फडणवीस यांना पोटशूळ उठलेला आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना समाजापेक्षा पक्ष मोठा वाटत आहे.राणेंनी कुणबी आणि मराठा ९६ कुळी मुद्दा आणून समाज मन कलूशित करायचे काम केल्याचा आरोप सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी केला .

२६ फेब्रुवारी जीआर काढला त्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सरळसेवा भरतीसाठी तो जीआर काढलेला आहे. त्याबद्दल आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतो.मराठा समाजाला चुकीचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केल्याबद्दल राजीनामा द्यावा.नितेश राणेंनी बोललेली जुनी वाक्य आहेत ,त्यात हे हापचड्डीवाल्यांचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देवू शकत नाही.फडणवीस हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत.त्याची प्रचिती नितेश राणे यांच्या रूपाने आम्हाला आता येत आहे.हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत,त्यांची जुनी भाषणे आठवावित. ज्यांचा सागर बंगल्यावर बॉस आहे,असे सांगत ते आता त्याच्या पाठीशी राहण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत,तर तेच नितेश राणे आरक्षण मिळवण्यासाठी विरोध करीत आहेत,असल्याची टीका सतीश सावंत यांनी केली.

मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांची चौकशी लावली तर ज्यावेळी भर सभेत माजी खासदार शिव्या देत होते,त्यावेळी फडणवीस गप्प का बसले ?मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज आहे.आरक्षण मुद्यावर आम्ही शांत बसणार नाही,असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला.

राजू रावराणे म्हणाले,मनोज जरांगे पाटील यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेत.राज्यातील मराठा समाजाचे खच्चीकरण केले जात आहे.आगामी काळात समाजाने त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.जे नेते विरोधात बोलताहेत त्यांना जागा दाखवा.असेही ते म्हणाले.