कणकवली रेल्वे स्थानक परिसरातील सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड अहोरात्र घेताहेत मेहनत ; आचारसंहितेपुर्वी लोकार्पनासाठी काम पुर्ततेची लगबग

कणकवली दि. २९ फेब्रुवारी ( भगवान लोके )
कोकणातील १२ रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणासाठी राज्यातील महायुतीच्या सरकारने १०० कोटी निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके त्यात कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या कामांचा सामावेश आहे. त्यातील कणकवली रेल्वे स्थानक परिसरातील सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर आहेत. कणकवली कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड अहोरात्र मेहनत घेत आहेत. आचारसंहितेपुर्वी या कामाचे उद्घाटन करत लोकार्पनासाठी काम पुर्ततेची लगबग युध्दपातळीवर जोरदार सुरु आहे.
रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरण करताना कणकवली येथे रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटकरण करणे, रस्त्याच्याकडेला प्रकाश दिवे लावणे, पेव्हड शोल्डर व आर.सी.सी. गटर्स बांधणे, महिला व पुरुष प्रवाशांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी, प्रवाशांसाठी स्थानक परिसरात स्टेशन प्लाझा, प्रवाशांसाठी स्थानक परिसरात बस थांबे बांधणे, स्टेशन प्लाझा अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतिक्षालयाची व्यवस्था करणे , ऊन पाऊसापासून संरक्षणासाठी कायम स्वरुपी व्यवस्था, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याकरीता प्रशस्त मार्ग, दुचाकी, चारचाकी, बस आणि रिक्षासाठी पार्किंगची व्यवस्था यासह विविध कामांचा सपाटा लावण्यात आला आहे. ही सर्व काम करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ६ कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्री नारायण राणे , बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण , आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आहे.
आगामी लोकसभा निवडणूक आचारसंहिता मार्च महिन्याच्या १५ तारीख पर्यंत लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी हे काम पुर्ण करण्याची कार्यपध्दती कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी राबवली आहे. सध्या या ठिकाणी लवकरात लवकर काम मार्गी लावण्यासाठी दिवसरात्र काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हे काम आचारसंहितेपूर्वी पुर्ण होणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या रेल्वे परिसर सुशोभिकरण कामाची पुर्तेतेनंतर या कणकवली शहराला एक वेगळीच नवी झळाळी मिळणार आहे.