स्काऊट गाईडमुळे स्वावलंबनाचे धडे

विद्यामंदिर हायस्कूलमधील चिंतन दिन कार्यक्रमात मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांचे प्रतिपादन

कणकवली दि.२९ फेब्रुवारी(भगवान लोके)

स्काऊट गाईडमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थी आत्मनिर्भर बनण्यास स्काऊट व गाईडची मोठी मदत होते. स्काऊट व गाईडमुळे शिस्त, नियमांचे पालन, एकाग्रता, स्वावलंबी बनण्यासाठी काय करावे, याचा अनुभव मिळतो. त्याचा तुमच्या भावी जीवनात नक्कीच उपयोग होतो, असे प्रतिपादन विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांनी येथे केले.
स्काऊट गाईडचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जयंतीनिमित्त विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेमध्ये चिंतन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. कांबळे बोलत होते. उद्घाटनप्रसंगी पर्यवेक्षिका व्ही. व्ही. जाधव, अच्युत वणवे, माजी गाईड शिक्षिका श्रद्धा कदम, स्काऊट मास्टर जनार्दन शेळके, गाईड कॅप्टन विद्या शिरसाट व सर्व स्काऊट गाईडचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. शेळके यांनी स्काऊटची सुरुवात कशी व कोठे झाली याची माहिती दिली. श्री. वणवे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्तीचे महत्त्व काय असते, त्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सो. कदम यांनी स्काऊट गाईडमुळे विद्यार्थी स्वाबलंबी कसे बनतात. शिबिराद्वारे कसे प्रशिक्षण मिळते, कशाप्रकारे शिस्त अंगी बाणली जाते, याविषयी मार्गदर्शन केले.
चिंतन दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये सर्वधर्म प्रार्थनेमध्ये स्काऊट गाईडच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन जनार्दन शेळके यांनी केले. आभार विद्या शिरसाट यांनी मानले