सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनस नाही मात्र बांधकाम विभागाचे सुशोभीकरण सुरू

सावंतवाडी,दि.२९ फेब्रुवारी 
कोकण रेल्वेच्या सावंतवाडी स्थानकावर टर्मिनसचे भूमिपूजन होऊन आठ वर्ष उलटली तरी टर्मिनस चा पत्ता नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलेले सुशोभिकरण, पायाभूत सुविधांचे काम मात्र वेगाने सुरू आहे. यावर साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर टर्मिनस उभे करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि तत्कालीन पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर आदींच्या उपस्थितीमध्ये आठ वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले होते त्यासाठी सुमारे १८ कोटींचा निधी मंजूर झाला होता. पहिल्या टप्प्यातील आठ कोटींचा निधी खर्च झाला आणि दुसऱ्या टप्प्यातला निधी परत गेला यासाठी सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने नुकतेच आंदोलन देखील केले. मात्र रेल्वे खात्याला जाग आलेली नाही त्यामुळे आता प्रवासी संघटनेचे पदाधिकारी थेट रेल्वे मंत्र्याची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील काही रेल्वे स्थानकावर सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याची घोषणा केली आणि प्रत्यक्षात काम सुरू झाले सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर साडेचार कोटी रुपये खर्च करून प्रवाशांसाठी कार पार्किंग, मोटरसायकल पार्किंग, रिक्षा पार्किंग, प्रवेशद्वार तसेच इतर पायाभूत सुविधांची निर्मिती आणि रेल्वे स्थानकासमोरील रस्ता रुंदीकरण करण्यासाठी निधी मंजूर केला आहे .यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांना विचारले असता ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजूर केलेले काम वेगाने सुरू आहे. लवकरच सुशोभीकरण, पायाभूत सुविधांचे काम पूर्ण झाले पाहीजे म्हणून प्रयत्न केला जात आहे.छप्पराचे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच आतील कामे वेगाने केली जातील. त्यामुळे रेल्वे स्थानक सुसज्ज दिसेल. मात्र रेल्वे च्या हद्दीमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचे काम हाती घेतले नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वेगाने काम करण्यासाठी निर्देश दिले आहेत.
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून काही वर्षांपूर्वी मागणी करण्यात आली होती. माजी आमदार कै. जयानंद मठकर, विद्यमान कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी त्यावेळी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता .दरम्यान सुरेश प्रभू यांच्याकडे रेल्वे मंत्रालय आले आणि त्यांनी सावंतवाडी टर्मिनस चे भूमिपूजन उरकले. मात्र गेल्या आठ वर्षापुर्वी भूमिपूजन झाल्या नंतर टर्मिनसला वेग आला नाही. तसेच रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा नाही किंवा त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाहीत. फक्त घोषणा झाल्याची चर्चा झाल्याने सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना निर्माण झाली अँड संदीप निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक आंदोलनही झाले याला सुमारे हजारांच्या वर सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या परिसरातील सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात सरपंच व नागरिक उपस्थित राहिले होते
यावेळी रेल्वे रेल्वेमंत्री यांची भेट घडविण्याचे आश्वासन मिळाले या पार्श्वभूमीवर सध्या सावंतवाडी प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर ,सागर तळवडेकर व पदाधिकारी दिल्ली येथे गेले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मध्यस्थीतून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घडविली जाणार आहे. यामुळे टर्मिनस ला चालना मिळेल तसेच रेल्वे गाड्यांनाही थांबा मिळेल, अशी अपेक्षा आहे.