भंडारी प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन संपन्न

मालवण,दि.२९ फेब्रुवारी

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित मालवण येथील भंडारी प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे तसेच कला कार्यानुभव विषयांतर्गत केलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विज्ञान प्रतिकृती सादर केल्या.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारी ए. सो.हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री. अवसरे यांच्या हस्ते फीत कापून तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रशालेचे विज्ञान प्रयोगशाळा परिचर नंदकिशोर मळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये शोधक वृत्ती वाढवणे, आत्मविश्वास वृद्धिंगत करणे, फुरसतीच्या वेळचा सदुपयोग करणे आदी विज्ञान प्रदर्शनामागील उद्देश असल्याचे यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेचे शिक्षक सौ. राधा दिघे, श्री.लोकेगांवकर, सौ. पूर्वी गोवेकर, विद्यार्थी तसेच पालक यांचे सहकार्य लाभले.

यावेळी विद्यार्थ्यांनी रोबोट, चांद्रयान ३, सोलर सिस्टम, पवनचक्की, बॅटरीवर चालणारा जेसीबी, पाण्याची घनता, पाण्याचा पृष्ठीय ताण, स्वयंचलित तोफ, फुफ्फुस, वॉटर पुरिफायर, दिशा व उपदिशा दर्शक, सौर उर्जेवर चालणारा दिवा, पाण्याचा दिवा, पचनेंद्रिये, अन्नातील पोषक घटक, पृथ्वीगोल, ज्ञानेन्द्रिये व कार्य यासारखे अनेक प्रयोग व प्रतिकृती विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर करत माहिती दिली. या प्रदर्शनास पालक व शिक्षणप्रेमी व्यक्तीनी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या उपक्रमाबाबत भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीही कौतुक केले.