कविता मिरवण्याची गोष्ट नाही : डॉ.अनिल धाकू कांबळी

तळेरे येथे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा : अक्षरोत्सव प्रदर्शनाचे आयोजन

तळेरे,दि. २९ फेब्रुवारी

कविता ठरवून करण्याची अथवा मिरवण्याची गोष्ट नाही. खोटं केलं तर ती तुमच्यावर सुड उगवते. कविता अवतरली पाहिजे. कवी व्याकूळ होत असतो असे सांगतांनाच माझ्या कवितेचा विषय माणूस आहे म्हणून मी कवी आहे, असे प्रतिपादन नामवंत कवी डॉ.अनिल धाकू कांबळी यांनी तळेरे येथे केले.

तळेरे येथील स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, वाचनालय आणि वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.अनिल धाकू कांबळी यांच्या हस्ते दीपप्ज्वलनाने आणि विनय पावसकर यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उप सरपंच शैलेश सुर्वे, माजी पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उपाध्यक्ष राजू वळंजू, सचिव मिनेश तळेकर, माजी सरपंच शशांक तळेकर, प्रवीण वरुणकर, शरद वायंगणकर, बी. पी. साळीस्तेकर, अक्षय मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान गीत सादर केले. यावेळी स्काऊट गाईड मधील यशवंत विद्यार्थी तसेच विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि पदक तसेच, प्राचार्य अविनाश मांजरेकर व विषय शिक्षिका धनलक्ष्मी तळेकर यांचाही गौरव करण्यात आला. तसेच, कवी डॉ. अनिल धाकू कांबळी, सरपंच हनुमंत तळेकर, सूर्यकांत तळेकर, निकेत पावसकर, प्राचार्य अविनाश मांजरेकर यांना शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

अक्षरोत्सव प्रदर्शनाचे आयोजन :-
यावेळी संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव या संग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त संग्रहातील साहित्यिक आणि विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या मराठी माणसांच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी सूर्यकांत तळेकर, विनय पावसकर, निकेत पावसकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश मांजरेकर, सूत्रसंचालन सुचिता सुर्वे तर आभार मिनेश तळेकर यांनी मानले. यावेळी सौ.श्रावणी मदभावे, मोहन भोगले, ग्रंथपाल साक्षी सुर्वे, संज्योग नांदलसकर, मंगेश कांबळे, सी.व्ही.काटे यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.