तुळजापूर देवगड गाडीत महीलेच्या बॅगेतील दागीने लंपास सुमारे ३ लाखाचे सोन्याचे दागीने चोरीस

0

९ जानेवारीची घटना, ११ जानेवारी रोजी आली निदर्शनास महीलेची देवगड पोलीस स्थानकात धाव अज्ञात चोरट्यावीरूध्द गुन्हा दाखल

देवगड,दि.१३ जानेवारी

सांगली येथे गावाकडून लग्नसमारंभ आटोपून देवगडला परतताना एस्टी प्रवासात ३ लाखाचे दागीने चोरीस झाल्याची घटना घडली असून हा प्रकार दोन दिवसांनी निदर्शनास आल्यानंतर संबंधीत महीलेने देवगड पोलीस स्थानकात धाव घेतली.पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

देवगड कॉलेज रोड येथील कॉम्प्लेक्स येथे राहणा-या सौ.सुप्रीया अविनाश गुंजाटे या महीलेचे प्रवासादरम्यान दागीने चोरीस गेले आहेत.ही घटना दि. ९ जानेवारी रोजी तुळजापूर देवगड एस्टीमध्ये प्रवास करताना घडली.

सौ.सुप्रिया अविनाश गुंजाटे(२८) मुळ रा.समडोळी जि सांगली या पती अविनाश गुंजाटे, सासू संगीता पराग गुंजाटे, मुलगा अद्विक यांच्यासह दि ५ जानेवारीला दिराचे लग्न असल्याने गावी समडोळी येथे गेल्या होत्या. लग्नसमारंभ आटोपून दि ९ जानेवारी रोजी त्या सासू व मुलगा यांच्यासहीत गावाकडून देवगडकडे येण्यास निघाल्या.येताना त्यांनी लग्नसमारंभात घालण्यासाठी नेलेले सर्व दागीने जांभळ्या रंगाच्या प्रवाशी बॅगमध्ये ठेवून सांगली एस्टी स्टँड येथे आल्या.त्यानंतर सांगली येथून सासू, मुलगा यांच्यासहीत दुपारी १ वाजता तुळजापूर देवगड या गाडीने देवगड येथे येण्यासाठी निघाल्या यावेळी दागीने ठेवलेली जांभळ्या रंगाची प्रवासाची बॅग त्यांच्याजवळ होती.ती बॅग बंद स्थितीत व्यवस्थित असल्याची खात्री करून त्यांनी घेतली.सुरूवातील गाडीत गर्दी असल्याने कोल्हापूरपर्यंत त्यांनी उभे राहून प्रवास केला यावेळी ती बॅग त्या उभ्या असलेल्या ठीकाणापासून दोन सीट पुढे ठेवण्यात आली होती.गाडी कोल्हापूर येथे आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी जागा भेटली यावेळी त्यांनी ती बॅग आपल्याकडे ठेवली.गाडी गगनबावडा एस्टी स्टँड येथे १० मिनिटाकरीता थांबली त्यावेळी फ्रेश होण्याकरीता सासू समवेत त्या गाडीतून खाली उतरल्या तत्पुर्वी जांभळ्या रंगाची प्रवाशी बॅग गाडीच्या सीटखाली ठेवून नंतर त्या खाली उतरल्या.पुन्हा गाडीत आल्यानंतर सीटच्या खाली असलेली बॅग बघीतली.गाडी रात्री ८.१५ वाजता देवगड स्टँडला आली.त्यानंतर गाडीतून उतरून रीक्षेने त्या राहत असलेल्या कॉम्प्लेक्स येथे आल्या.घरी आल्यानंतर थकून आल्यामुळे त्यांनी ती बॅग उघडून बघीतली नाही.ती बॅग गुरूवार दि. ११ जानेवारी रोजी दुपारी १२ वा.सुमारास पुजा करायची असल्याने उघडून पाहीली यावेळी त्या बॅगेत ठेवलेले १ लाख रूपये किंमतीचे ४ तोळ्याचे सोन्याचे घंटन,६० हजार रूपये किंमतीचे ३ तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, ५० हजार रूपये किंमतीचा सोन्याचा पावणेतीन तोळ्याचा लक्ष्मीहार, २० हजार रूपये किंमतीचा सोन्याचा राणीहार, २५ हजार रूपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्याची चैन, ४ हजार रूपये किंमतीचा चांदीचा छल्ला, १४ हजार रूपये किंमतीचा ७ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, १० हजार रूपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची साखळी असा एकूण ३ लाख ८ हजार किंमतीचा ऐवज मिळाला नाही. याबाबत तक्रार सौ.गुंजाटे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द भादविकलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे करीत आहेत.