अचानक दिल्लीला झाले रवाना
मुंबई,दि.२५ ऑक्टोंबर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम तडकाफडकी रद्द करत अचानक दिल्लीकडे धाव घेतली आहे. हा दौरा पूर्वनियोजित नसतानाही, ते दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. अचानक होत असलेल्या या दिल्ली दौऱ्यामुळं एकनाथ शिंदे नाराज आहेत की आगामी महापालिका निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे अशी चर्चा सुरू आहे.
शिंदे यांच्या दिल्ली भेटीला महत्त्वाचे कारण मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकांतील जागावाटप असू शकते. भाजपकडून मुंबईत ‘मिशन १५०’ अंतर्गत १५० पेक्षा जास्त जागा लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, शिंदे यांच्या शिवसेनेने किमान १०० जागा तरी मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भाजपने जर १५० जागा लढवल्या, तर २२७ जागांपैकी शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतील, याबद्दल राजकीय तिढा निर्माण झाला आहे. याच जागावाटपाच्या मुद्द्यावर कैफियत मांडण्यासाठी शिंदे दिल्लीत गेले असावेत, अशी चर्चा आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये काही प्रमाणात ‘कोल्ड वॉर’ (शीत युद्ध) सुरू असल्याची चर्चा होती. काही ठिकाणी विकास प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळाल्याची चर्चा होती. युतीतील हा समन्वय साधण्यासाठी आणि राज्यातील सद्यस्थितीबद्दल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला माहिती देण्यासाठी शिंदे यांनी हा दौरा केला असावा, असे मानले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये भाजपचे प्रमुख नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत राज्यात युतीचा समन्वय कसा साधायचा, तसेच महानगरपालिका निवडणुकांमध्ये अंतिम जागावाटप काय असावे, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.


