सावंतवाडी, दि. २६ ऑक्टोबर
गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत स्थापन झालेल्या ‘मळगाव ग्रामविकास परीवर्तन सेने’ची बैठक २५ रोजी सायंकाळी ७ वाजता खानोलकर हॉल येथे उत्साहात पार पडली. या बैठकीला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावाच्या विकासासाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीदरम्यान गावातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज समस्या, घरपट्टी तसेच विद्यमान ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीतील भ्रष्टाचार आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव पगारासंदर्भात तीव्र चर्चा झाली. विद्यमान कार्यकारिणीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत, त्या संदर्भातील भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्याचा निर्धार उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला.
यावेळी ग्रामविकास परीवर्तन सेनाच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठामपणे भूमिका घेण्याचा संकल्प व्यक्त केला. “गावात १००% परिवर्तन घडवून आणूच!” असा घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
बैठकीस ग्रामविकास परीवर्तन सेना निमंत्रक पांडुरंग राऊळ, महेश खानोलकर, राजन पटेकर, गुरुनाथ गावकर, विलास मळगावकर, बाप्पा नाटेकर, नितेश तेली, सिद्धेश आजगावकर, प्रसाद गावकर, शेखर राऊळ, मनोज राऊळ, अशोक गावकर, निखिल पुळास्कर, अनिकेत राऊळ, लवू राऊळ यांच्यासह गावातील अनेक युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीतून ग्रामविकास परीवर्तन सेनेने मळगावातील विकासाच्या नव्या पर्वाची सुरूवात केल्याचे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


