सावंतवाडी दि. २६ ऑक्टोबर
पावसाळा संपल्यानंतरही सावंतवाडी शहरात आज रविवारी धुवांधार पाऊस कोसळल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पावसाची रिपरिप सुरू झाली आणि पाहता पाहता पावसाने चांगलाच जोर धरला.
पावसाळ्याचा हंगाम संपल्यानंतर हा अवकाळी पाऊस कोसळत असल्याने या तालुक्यातील शेती आणि बागायती पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः दिवाळीच्या काळात गुलाबी थंडीची सुरुवात होते, जी काजू आणि आंबा या महत्त्वाच्या फळझाडांना मोहर (बहर) येण्यासाठी पोषक ठरते.
मात्र, यंदा हंगामापूर्वी आणि आता हंगामाच्या नंतरही पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण बदलले आहे. अपेक्षित थंडी ऐवजी पाऊस झाल्याने या दोन्ही फळझाडांच्या मोहरावर आणि पर्यायाने उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे. सततच्या या हवामान बदलामुळे शेतकरी आणि बागायतदार चिंतेत पडले असून, त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिक आणि शेतकरी दोघांचेही नुकसान झाले आहे.


