बांदा :दि. २६ ऑक्टोबर
पावनखिंडीतील घनघोर युद्धाचा ऐतिहासिक प्रसंग आता प्रत्यक्ष स्वरूपात बांद्यात पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड यामधील घोडखिंडीत घडलेली ही शौर्यगाथा बांदा येथील श्रीराम चौकात श्री गणेश चित्रशाळा दुर्ग संवर्धक ग्रुपतर्फे साकारण्यात आली आहे.
या कलाकृतीतून छत्रपती शिवाजी महाराज आणि सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचे हुबेहूब दर्शन घडवण्यात आले आहे. चिकणमाती, शाडूमाती, दगड आणि सुमारे दीड डंपर माती वापरून सात दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही वास्तू उभारण्यात आली आहे. रात्री आकर्षक विद्युत रोषणाईमुळे या ठिकाणाचे सौंदर्य अधिक खुलले असून, इतिहासप्रेमी, शिवभक्त आणि लहान मुलांची गर्दी वाढत आहे.
साडेतीन फूट उंच तटबंदीवर शिवरायांची बैठी मूर्ती, मावळ्यांच्या प्रतिमा आणि रंगीत सजावट यामुळे गडाचे वास्तवदर्शी रूप साकारले आहे. या गडउभारणीसाठी गिरीश भोगले, भाई म्हाडगुत, रघुनाथ सावंत, सर्वेश नाईक, समील नाईक, बाळा बहिरे, सूरज राऊळ, सुमित नाईक, सुहास आणि निलेश सावंत यांनी परिश्रम घेतले.
गडकोट मोहीम अधिक प्रभावी
इतिहासतज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि हिंदू विचार मंचचे सहकार्य यामुळे या वर्षीची “गडकोट मोहीम” अधिक प्रभावी ठरली आहे. “दरवर्षी नवीन कल्पकतेने इतिहास जिवंत करण्याचा आमचा प्रयत्न असतो,” असे दुर्ग संवर्धक ग्रुपचे सदस्य समील नाईक यांनी सांगितले.


