बांदा परिसरात शिवसेनेत (शिंदे गटात) नव्या प्रवेशांची लाट सुरूच

बांदा,दि. २६ ऑक्टोबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीनंतरही राजकीय हालचालींना वेग आला असून, बांदा परिसरात शिवसेनेत (शिंदे गटात) नव्या प्रवेशांची लाट सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे. शनिवारी सायंकाळी बांदा येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतील युवा तालुकाप्रमुख रियाज खान यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उद्धव गटाला रामराम ठोकत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशानंतर बोलताना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, “शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान व आदर मिळेल. त्यांच्या सुखदुःखाची काळजी आम्ही नक्की घेऊ. आमचे राजकारण हे केवळ सत्तेसाठी नाही, तर लोकांसाठी आहे.”
कार्यक्रमास महिला आघाडी जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत कविटकर, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, तालुका संघटक गुरुनाथ सावंत, बांदा शहर प्रमुख ज्ञानेश्वर सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
तथापि, संजू परब यांनी भाषणादरम्यान भाजपवर तीव्र शब्दांत हल्लाबोल करत स्थानिक राजकारणात खळबळ उडवली. त्यांनी नाव न घेता इशारा देत म्हटले, “एक हजार रुपये देऊन पक्षप्रवेश करून घेणारे भाजपचे काही माणसं त्यांच्या नेत्यांना फसवतात. मी काल जो शॉक दिला तो व्यवस्थित दिला आहे, त्यामुळे त्यांची बोलती बंद झाली आहे. आता मी धक्यावर धक्का देणार आहे आणि घेणार ते भाजपचेच घेणार!”
परब पुढे म्हणाले, “संजू परब कोणाला घाबरत नाही. संजू कोणाच्या जमिनी विकत घेत नाही, खोटे करार करून कोटी रुपये आणत नाही आणि लोकांचे पैसे लुटत नाही. जे हे प्रकार करतात, ते समाजकारण काय करणार? अशा लोकांना आता योग्य धडा शिकवला जाईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “ज्यांसोबत व्यवहारात फसवणूक झाली आहे, अशा सर्वांची एकत्र पत्रकार परिषद घेऊन सगळं सत्य जनतेसमोर आणू. हे लोक किती प्रामाणिक आहेत हे नागरिकांनी पाहायलाच हवं.”
संजू परब यांच्या या वक्तव्यामुळे बांदा परिसरात राजकीय वातावरण अधिकच तापले असून, भाजपच्या गोटातही चांगली खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे. नव्या प्रवेशांमुळे शिंदे गटात चैतन्य निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत आणखी काही जण प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.