पालकमंत्री ना. नितेश राणे : “भजन परंपरेचं जतन आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी”

देवगड,दि.२६ ऑक्टोंबर

‘पालकमंत्री चषक भजन स्पर्धे’चा शुभारंभ कुणकेश्वर देवस्थान येथे पार पडला. या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उपस्थित राहून भजनी बुवांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शेकडो भजनी बुवा उपस्थित होते.

पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले, “भजन स्पर्धेच्या निमित्ताने समाजात एकता, संघटितपणा आणि संस्कृतीचं जतन हा अतिशय चांगला संदेश दिला जात आहे. भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं काम होतं आणि त्यातून भावी पिढीपर्यंत आपल्या परंपरेचा वारसा पोहोचतो.”

ते पुढे म्हणाले, “या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्नशील आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री या नात्याने आपल्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. संतोष कानडे यांच्यासारखे कार्यकर्ते या क्षेत्रात कार्यरत असल्याचा मला अभिमान आहे.”

पालकमंत्री यांनी पुढे भजनी बुवांच्या मानधनासंबंधी निर्णयांचा उल्लेख करत सांगितले, “फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने भजनी बुवांच्या मानधनात वाढ केली आहे. ही केवळ घोषणा नसून प्रत्यक्ष कृतीतून दाखविलेले कार्य आहे.”

तसेच त्यांनी आणखी एका महत्त्वाच्या मागणीवर भाष्य करत सांगितले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘भजन सदन’ उभारण्याची गरज आहे. ही मागणी योग्य असून, माझ्या कार्यकाळात ती पूर्ण करण्याचा मी शब्द देतो. आपल्या कलेचं जतन आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि सरकार म्हणून आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत.”

शेवटी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत भजन परंपरेचं जतन करण्याचं आवाहन केलं.

व्यासपीठावर माजी आमदार ॲड. अजित गोगटे, संतोष कानडे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, प्रकाश राणे, संदीप नाईकधुरे, गणेश वाळके, बुवा विजय परब, सरपंच महेश ताम्हणकर, देवस्थान सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, बुवा प्रकाश पारकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.