देवगड,दि.२६ ऑक्टोंबर
कोकणाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थांबा मिळवून दिल्याबद्दल श्री देवगड गुजराती नवरात्रौ उत्सव मंडळ, देवगडच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे कॅबिनेट मंत्री, मत्स्यव्यवसाय, बंदरे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची कुणकेश्वर येथे भेट घेतली आणि त्यांचे विशेष आभार व्यक्त केले
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसल्यामुळे येथील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. मागील काही वर्षांपासून जिल्हावासियांकडून या थांब्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. विशेष म्हणजे देवगड मधील गुजराती नवरात्र मंडळाने नामदार नितेश राणे यांची भेट घेऊन हे थांबे मिळावे म्हणून निवेदन दिले होते व मागणी केली होती खासदार नारायणराव राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे ही मागणी पूर्ण झाली असून या प्रयत्नांमुळे, एर्नाकुलम – अजमेर मरुसागर एक्सप्रेस (ERNAKULAM – AJMER MARUSAGAR EXPRESS) या गाडीला सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर, तर हिसार – कोईम्बतूर एक्सप्रेस (HISAR – COIMBATORE EXPRESS) या गाडीला कणकवली रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे.
या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल नामदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी श्री देवगड गुजराती नवरात्रौ उत्सव मंडळ-देवगडच्या वतीने त्यांना पत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी दिनेश पटेल, प्रशांत पटेल, लहरिकांत पटेल, भावेश पटेल आणि मनीष पटेल हे उपस्थित होते.


