देवगड मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. सुनील आठवले यांच्या हस्ते
देवगड,दि.२६ ऑक्टोंबर
फ्रेंडस् सर्कल- देवगड, गुजराती नवरात्र मंडळ देवगड व सिंधु रक्तमित्र- शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी येथील ‘राधाकृष्ण रिट्रेट’ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात विवाहित महिलेसह एका युवतीने रक्तदानाचा पवित्र हक्क बजाविला. तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचाही सुमारे ४५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन देवगड मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. सुनील आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी नगरसेवक नितीन बांदेकर, गुजराती मंडळाचे पुरुषोत्तम पटेल, विठ्ठल पटेल यांच्यासह फ्रेंडस् सर्कल व सिंधू रक्तमित्र देवगड शाखेचे सदस्य उपस्थित होते. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या आवाहनानुसार ए-निगेटिव्ह, बी- निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या रक्तदात्यांनीही आवर्जुन रक्तदान केले. या शिबिरात महिला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त नोंदणी केली होती. यात सौ. तन्वी सुमित कुबल व कु. जुई श्रीकांत बिडये यांना रक्तदानाचा हक्क बजाविता आला. देवगड पोलीस स्थानकाचे प्रवीण सावंत, राजा पाटील, राहुल राऊत, रवींद्र महाले, प्रशांत भिवसन यांनीही रक्तदानाचे पवित्र कार्य बजाविले. शिबिरात काही ज्येष्ठांनीही प्रथमच रक्तदान केले. रक्तदात्यांसाठी गुजराती मंडळ व फ्रेंडस् सर्कलच्यावतीने चहानाश्ताची सोय करण्यात आली होती. हे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी ओरोस रक्तपेढीचे डॉ. भारती ठोंबरे, प्राची परब, साई सावंत, मयुरी शिंदे, प्रथमेश घाडी, सागर सावंत, नितीन गावकर यांनी विशेष सहकार्य केले. तर मोफत नेत्र तपासणी शिबिरासाठी देवगड मेडिकल फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.


