शेअर्स खरेदीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी एकजण ताब्यात

कसून चौकशी सुरु; या प्रकरणातील संशयित पती,पत्नीच्या शोधात पोलीस

कणकवली दि.२९ फेब्रुवारी(भगवान लोके)

बनावट मनी कंट्रोल ॲप डाऊनलोड करून देऊन बनावट स्टेटमेंट देत ३२ लाख ९४ हजार ९३४ रुपयाची शेअर्स खरेदीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या तीन संशयीतांमधील प्रथमेश श्रीकांत राणे (रा. इन्सुली-सावंतवाडी) याला गुरुवारी कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.या प्रकरणातील संशयित पती,पत्नीच्या शोधात पोलीस आहेत.

तुमच्या नावे शेअर्स खरेदी करून फायदा मिळवून देतो, असे सांगत धनादेशाद्वारे रकमा घेऊन शेअर्स खरेदी न करता बनावट मनी कंट्रोल अॅप डाऊनलोड करून देऊन, बनावट स्टेटमेंट देत फिर्यादी सूर्यकांत नारायण तायशेटे (७५) आणि त्यांची पत्नी शुभांगी तायशेटे (दोन्ही रा. कणकवली) यांची फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये विवेक विजय पार्टे, वेदिका वैभव पार्टे (दोन्ही रा. शिरोडा नाका सावंतवाडी) आणि प्रथमेश श्रीकांत राणे (रा. इन्सुली-सावंतवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना १९ जुलै २०२२ ते २७ डिसेंबर २०२३ यादरम्यान घडली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत.