तळेरे,दि.२७ ऑक्टोंबर
आपल्या दिव्यांग बांधवांना सर्व शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही सदैव दिव्यांगांच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले. ते तळेरे येथे आयोजित केलेल्या दिव्यांग मेळाव्यात बोलत होते.
तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक दीपक कापसे, स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, तळेरे विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, स्थानिक शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर, निलेश सोरप, सुनील तळेकर वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, उपाध्यक्ष शशांक तळेकर, सचिव मिनेश तळेकर, साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, तळेरे उप सरपंच संदीप घाडी, तळेरे पोलिस पाटील चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल, ग्रामपंचायत तळेरे आणि स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तळेरे, कासार्डे, ओझरम, दारूम व साळीस्ते पंचक्रोशीसाठी आयोजित करण्यात आला होता.
दिव्यांगाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : दीपक कापसे
दिव्यांगांच्या विविध मागण्यांविषयी यावेळी कापसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच, दिव्यांगांना मिळणारी पेन्शन वाढवली असून ती मिळत नसल्यास अपंग प्रमाणपत्र आणि युडीआयडी ची झेरॉक्स तहसील कार्यालयात जमा करावी, असे आवाहन दीपक कापसे यांनी केले.
यावेळी उपस्थितांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येऊन काही साहित्य मोफत वाटप करण्यात आले. बालकृष्ण पांचाळ, दशरथ नकाशे, चंद्रकांत घाडी यांना श्रावण यंत्र, दिलीप कल्याणकर यांना पांढरी काठी मोफत देण्यात आली. यावेळी अविनाश मांजरेकर, दीपक कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सुनील तांबे, विशाखा कासले, प्रसन्ना दळवी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मिनेश तळेकर, अहवाल वाचन विशाखा कासले यांनी केले.


