फिर्यादी महेंद्र तांबे यांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले
कणकवली दि.२९ फेब्रुवारी(भगवान लोके)
मैत्रीपूर्ण संबंधांमुळे कळसुली येथील महेंद्र शांताराम तांबे यांचा विश्वास संपादन करून कौटुंबिक गरजेकरीता ३ लाख रुपये हातउसने घेतले. ही रक्कम परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील सुनील कमलाकर तांबे (सध्या मुंबई) याला येथील सह प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम. बी. सोनटक्के यांनी दोषी ठरवून सहा महिने कारावास व धनादेशाच्या रकमेएवढा तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. फिर्यादी महेंद्र तांबे यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा घेत, सुनील तांबे याने महेंद्र तांबे यांच्याकडून मे २०१५ मध्ये तीन लाख रुपये दोन हप्त्यामध्ये हातउसने सहा महिन्यांकरीता घेतले होते. सदरची रक्कम ठरलेल्या कालावधीत परतफेड न करता फिर्यादीच्या मागणीवरून आरोपीने त्याला अभ्युदय को. ऑप. बँकेचा वडाळा शाखचा धनादेश दिला होता. मात्र, आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटला नव्हता. म्हणून फिर्यादीने वकिलांमार्फत नोटीस पाठवून त्याच्याविरूद्ध निगोशिएबल इन्स्ट्मेंट कायद्याखाली खासगी फिर्याद दाखल केली होती.
सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला सहा महिन्यांचा कारावास व धनादेशाच्या रकमेएवढा तीन लाखांचा दंड व चेक दिल्याच्या तारखेपासून ९ टक्के व्याज दोन महिन्यांत अदा करण्याचे आदेश दिले. तसेच दंड व व्याज अदा न केल्यास आणखी सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.