ऐतिहासिक राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला…

पालकमंत्री राणेंच्या निर्देशानंतर तात्काळ निर्णय; पालकमंत्री, आमदार, भाजप जिल्हाध्यक्षांचे सौ. खोत यांनी मानले आभार…

मालवण,दि.२८ ऑक्टोबर

पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेला राजकोट किल्ला पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर आज पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे दिवाळी सुट्टीमध्ये मालवणमध्ये आलेल्या पर्यटकांना दिलासा मिळाला आहे, तसेच स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसाय पुन्हा तेजीत येणार आहे. या निर्णयाबद्दल सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी पालकमंत्री, आमदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.

यंदाच्या दिवाळी सुटीत मालवणमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र, वादळी पावसामुळे ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग पर्यटनासाठी तसेच जलक्रीडा तात्पुरत्या स्वरूपात बंद असल्याने पर्यटकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला होता. त्यामुळे अनेक पर्यटकांनी आपले लक्ष रॉकगार्डन आणि राजकोट किल्ला या स्थळांकडे वळवले होते. यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत होता.
या उत्साहाच्या वातावरणात काल अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कारणास्तव राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद केला. ऐन पर्यटन हंगामात किल्ला बंद झाल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय झाली, तसेच स्थानिक व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला.
या समस्येबाबत काल स्थानिक पर्यटन व्यवसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांची भेट घेऊन लक्ष वेधले. पर्यटन हंगाम आणि व्यावसायिकांचे होणारे मोठे नुकसान लक्षात घेता सौ. खोत यांनी तात्काळ भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्यामार्फत ही गंभीर बाब पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती केली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी तात्काळ तहसीलदारांना आजपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे निर्देश दिले.
पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार, राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांना मालवणच्या या सुंदर ऐतिहासिक स्थळाचा आनंद घेता येणार आहे आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
किल्ला तात्काळ खुला केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांनी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.