अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पंचनाम्यानंतरही भरपाईबाबत अनिश्चितता

बांदा,दि.२८ ऑक्टोबर
सावंतवाडी तालुक्यात गेल्या सहा-सात दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाडलोस, रोणापाल, मडुरा, कास, निगुडे, सातोसे, न्हावेली, दांडेली, बांदा, शेर्ले, विलवडे, वाफोली आणि इन्सुली या भागातील शेतकऱ्यांच्या भातशेतीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकतेच कापलेले भात शेतातच सडले असून काही ठिकाणी कोंब फुटल्याने पीक पूर्णपणे निकामी झाले आहे.
या नुकसानीनंतर महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली, तरी नुकसान भरपाई नेमकी कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि अनिश्चितता आहे. सात दिवसांपूर्वी कापलेले भात अजूनही शेतातच पडून असून ओलसर वातावरणामुळे त्याचा दर्जा आणि उत्पादन दोन्ही घसरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

उभ्या पिकाचाही पंचनामा करा
पंचनामा केवळ पडलेल्या किंवा कोंब फुटलेल्या भातपिकाचा न करता उभ्या पिकाचाही केला जावा. कारण अनेक ठिकाणी उभे भातपीकही आता शेतातच गळून पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. शासनाने कोणतेही कठोर निकष न लावता सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी तथा कास सरपंच प्रवीण पंडित यांनी केली आहे.

अवकाळी पावसामुळे हंगामातील मेहनत आणि खर्च दोन्ही पाण्यात गेल्याने शेतकरी निराश झाले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करून ती एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या हाती पोहोचवावी, जेणेकरून शेतकरी रब्बी हंगामातील शेती अधिक जोमाने करेल.
– मिलिंद सावंत, तालुकाध्यक्ष, मनसे, सावंतवाडी