उपोषणकर्ते मयूर करंगुटकर यांची प्रकृती खालावली

हडी ग्रा. पं. परिसरातील आंबा कलम तोडीविरोधात उपोषण

मालवण,दि.२८ ऑक्टोबर

हडी ग्रामपंचायत परिसरातील ग्रामपंचायतीच्या मालकीची उत्पन्न देणारी आंबा कलमे ठेकेदार व ग्रामपंचायत हडी यांच्याकडून बेकायदेशीररित्या तोडण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हडी गावचे ग्रामस्थ मयूर करंगुटकर यांनी कालपासून हडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण आजही सुरु असून मयूर करंगुटकर यांची प्रकृती खालावली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असले तरी संबंधित ठेकेदार व सरपंच यांच्यावर गुन्हा दखल होत नाही, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मयूर करंगुटकर यांनी घेतली आहे.

हडी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील आंबा कलमे कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आली असा आरोप मयूर करंगुटकर यांनी केला असून याबाबत चौकशीसाठी जिल्हा बांधकाम विभाग, तहसीलदार, मालवण पोलीस स्थानक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केले होते. मात्र या प्रकरणी कोणतीही चौकशी न करता संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे याबाबत करंगुटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधत याबाबत कारवाई न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी काल सकाळी अकरा वाजल्यापासून हडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण छेडले आहे. गावातील काही ग्रामस्थानीही त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत उपस्थिती दर्शवली. काल दिवसभरात ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस तसेच जि. प. बांधकाम विभाग यापैकी कोणत्याही शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी करंगुटकर यांची भेट घेतली नव्हती. तर सायंकाळी उशिरा मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी करंगुटकर यांना पत्र पाठवून या प्रकरणातील ग्रामपंचायत व पंचायत समितीशी निगडित मुद्द्यांची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती. मात्र या प्रकरणात दोषी असणाऱ्या संबंधित ठेकेदार व हडी सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करंगुटकर यांनी करत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे करंगुटकर यांचे उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होते.

उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मयूर करंगुटकर यांच्या शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. आपण उपोषण स्थळावरून हलणार नसून उपोषण स्थळीच आपल्याला सलाईन लावून उपचार करण्यात यावेत, अशी भूमिका करंगुटकर यांनी घेतली आहे.