बांदा,दि.२८ ऑक्टोबर
महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि वाढत्या वीज समस्यांमुळे त्रस्त झालेल्या मडूरा पंचक्रोशीतील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत सहाय्यक अभियंता रघुनाथ ठाकूर यांना घेराव घालून जाब विचारला. वीज बिल थकबाकी आणि वसुलीच्या बाबतीत महावितरण पूर्णपणे सतर्क असतो. मात्र, ग्राहक सेवा देण्यात मात्र पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिकांनी यावेळी केला. येत्या १० नोव्हेंबर पर्यंत सुधारणा न झाल्यास वेगळी पद्धत अवलंबू. तसेच व्यवस्थापकीय संचालकांकडे तुमच्या तक्रारीचा पाढा वाचू, असा इशारा देण्यात आला.
मडूरा पंचक्रोशीतील संतप्त ग्राहकांनी बांदा महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी कास सरपंच प्रवीण पंडित, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, मडूरा माजी उपसरपंच उल्हास परब, माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर, निगुडे माजी उप सरपंच गुरुदास गवंडे, नंदकिशोर कासकर आदी उपस्थित होते.
दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे प्रवीण पंडित यांनी सांगितले. स्थानिक वायरमन, लाईनमन आणि थेट सहाय्यक अभियंता हे देखील ग्राहकांनी मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी केलेले फोन उचलत नाहीत, अशा तक्रारी केल्या. वीज बिल वसुली आणि थकबाकीच्या बाबतीत महावितरण तत्परता दाखवते. मात्र, ग्राहकांना आवश्यक सेवा आणि तातडीची मदत पुरवण्यात महावितरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुरेश गावडे यांनी केला.
मडूरा, रोणापाल भागात नवीन ११ केव्ही लाइन टाकण्याचे काम संबंधित ठेकेदार निकृष्ट करीत असल्याकडे उल्हास परब यांनी लक्ष वेधले. किरकोळ बिलांच्या रकमेसाठी लाईनमन वीज कनेक्शन तोडत आहेत. असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा गुरुदास गवंडे यांनी दिला.
यावेळी प्रकाश वालावलकर यांनी वायरमन, लाईनमन फोन उचलत नसल्याचे प्रत्यक्ष पुरावे सादर केले. कारभारात सुधारणा करा अन्यथा व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रारी करण्याचा इशारा देण्यात आला.


