वेंगुर्ला ,दि.२९ ऑक्टोबर (प्रथमेश गुरव)
वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचा वाढदिवस ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता साजरा होणार आहे. यानिमित्त येथील स्वामिनी मंगल कार्यालयात ‘दीपसचिन स्वरसंध्या‘ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बांदा येथील महेंद्र मांजरेकर प्रस्तुत या कार्यक्रमात गोवा आयडॉल कोकणचे महागायक अक्षय नाईक व गोमंतकीय सुप्रसिद्ध गायिका गौतमी हेदे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत व चित्रपट गीतांची मेजवानी या निमित्ताने वेंगुर्लावासीयांना लाभणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन मालवणचे सुपुत्र अक्षय नाईक करणार आहेत. सिंथेसायझरवर महेंद्र मांजरेकर, अॅक्टोपॅडवर अश्विन जाधव, तबला सिद्धेश कुंटे, पखवाज व ढोलक गौतम पिंगुळकर व गिटारवर रोहन नाईक साथसंगत करणार आहेत.
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, शहराध्यक्ष उमेश येरम, युवासेना जिल्हाध्यक्ष हर्षद डेरे व शिवसेनेच्या विविध पदाधिका-यांची यावेळी खास उपस्थिती असणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यावेळी उपस्थित राहून सचिन वालावलकर यांना शुभेच्छा देणार आहेत. वेंगुर्ला शिवसेना व वेंगुर्ल्यातील विविध संस्थांच्यावतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला वेंगुर्ला शहरवासीय व सचिन वालावलकर हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


