अन्यथा स्वबळावर लढायला तयार – माया कटारिया

वेंगुर्ला ,दि.२९ ऑक्टोबर
राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह लोकांसमोर घेऊन जाण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे. जर मित्रपक्षांनी आम्हाला सोबत घेतलं नाही तर निश्चितच आम्ही मागे राहणार नाही. स्वबळावर लढायला आम्ही तयार आहोत. स्वबळावर लढणार हे इतर पक्षांचे काही स्थानिक पदाधिकारी बोलतात. मात्र वरीष्ठ पातळीवर अशा प्रकारच्या चर्चांवर निर्णय घेतले जातील. त्यामुळे स्वबळाच्या चर्चांवर आपण जास्त महत्त्व देत नाही अशी पतिक्रिया अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला कोकण विभागीय निरीक्षक माया कटारिया यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत दिली.
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील महिला काथ्या संस्थेच्या कार्यालयात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत निरीक्षक माया कटारिया बोलत होत्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक दिशा दाभोळकर, पनवेल शहर महिला अध्यक्ष प्रज्ञा चव्हाण, प्रदेश सरचिटणीस एम.के.गावडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष रामचंद्र सावंत, देवगड तालुकाध्यक्ष रशीद खान, प्रांतिक सदस्य देवगड बाळा कोयंडे, वेंगुर्ला महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर, जिल्हा युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर, अनंत पाटकर, तालुका सरचिटणीस संतोष सावंत, कणकवली महिला तालुकाध्यक्ष स्नेहल पातडे, सावंतवाडी महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष रंजना निर्मळ, वेंगुर्ला महिला शहर अध्यक्ष सुवर्णा शिरोडकर, शहर उपाध्यक्ष सुचिता परब, दोडामार्ग महिला तालुकाध्यक्ष धारिणी देसाई, कुडाळ महिला उपाध्यक्ष उज्वला येळावीकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रविणा खानोलकर, रोहिणी सावंत, अंजली धुरी आदी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना निरीक्षक माया कटारिया म्हणाल्या की, मी निरीक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात असलेली परिस्थिती व पक्ष म्हणून आम्हाला काय करायला पाहिजे याबाबत सकारात्मक चर्चा आजच्या बैठकीत झाली. जास्तीत जास्त उमेदवार रणांगणात उतरण्यास तयार आहेत. या दृष्टीने कार्यकर्ते, पदाधिका-यांची निवडणूक संदर्भातील तयारी, पक्ष संघटना आणि स्थानिक स्वराज्य निवडणूक याबाबत माहिती घेण्यासाठी आजची बैठक महत्वपूर्ण होती.  प्रत्येक पदाधिकारी पक्षात काम करत असताना कोणत्या पदाधिका-याला त्याच्या भागात किती प्राबल्य आहे, कोणत्या पदाधिका-याला जनमाणसाची साथ आहे, याबाबत माहिती घेण्यात आली.
     या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमच्या पदाधिका-यांना मित्रपक्षाकडून विश्वासात घेतले जात नाही अशी खंत सुद्धा या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असल्याचे कटारिया यांनी सांगितले. यामुळे या बैठकीबाबत सविस्तर माहिती वरिष्ठांना देणार असल्याचे त्यांनी सांगितलं.