वेंगुर्ला ,दि.२९ ऑक्टोबर (प्रथमेश गुरव)
स्वास्थ्यकेंद्रीत जीवनशैली आणि सर्व प्रकारच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी आयोजित केलेल्या दोन दिवशीय अनुभवात्मक कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही कार्यशाळा ११ व १२ तसेच २५ व २६ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली.
या कार्यशाळेत सृष्टीचक्रे चालविणारी दृश्यअदृश्य तत्त्वे आणि त्यांची शुद्धीकरण शक्ती, केमिकल मुक्त स्वास्थ्यकेंद्रीत जीवनशैली, सर्व प्रकारच्या प्रदूषणावर तसेच हवामान बदलावर मात करण्याचे वनस्पतीनिर्मित उपाय, विषमुक्त शेतीचा नैसर्गिक मार्ग, मन आणि शरीर घडविणारा तसेच बिघडवणारा आहार, मधुमेहातून बाहेर पडण्यास सहाय्यकारी आहार, स्त्रीयांच्या समस्या तसेच गर्भधारणेतील अडथळ्यांची कारणे आणि उपाय याबाबत अजितकुमार परब यांनी उपस्थितांना मूलभूत माहिती दिली. या कार्यशाळेचा लाभ यवतमाळ, अमरावती, पुणे, नाशिक, फलटण, मुंबई, सफाळे, सांगली, सातारा, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी व सिंधुदुर्गातून आलेल्या सहभागींनी घेतला. यामध्ये डॉक्टर्स सुध्दा सहभागी झाले होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी वायंगणी येथील प्रसाद पेडणेकर आणि कासवमित्र सुहास तोरस्कर यांनी मेहनत घेतली.


