३० ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन सुरु करण्याचा इशारा
मालवण,दि.२९ ऑक्टोबर
मालवण शहरात कचरा संकलन करताना मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगार असलेल्या ट्रॅक्टर चालकाला मालवण मधील एकाने मारहाण केल्याच्या निषेधार्थ मालवण नगरपालिकेचे कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी मालवण नगरपालिका प्रशासन व पोलीस स्थानाकात धाव घेत संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत कारवाई न झाल्यास उद्या ३० ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन सुरु करण्याचा इशारा दिला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण नगरपालिकेचे कंत्राटी स्वच्छता कामगार आज मालवण वायरी भागात कचरा उचल करत असताना कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालकाला एका व्यक्तीने ट्रॅक्टर वळविण्याच्या कारणावरून मारहाण केली. या घटनेमुळे संतप्त बनलेल्या स्वच्छता कंत्राटी कामगार तसेच नगरपालिकेचे स्वच्छता कामगार यांनी नगरपालिका प्रशासनाचे स्वच्छता निरीक्षक श्री. पवार यांच्याकडे धाव घेत त्यांचे लक्ष वेधत सदर व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र श्री. पवार व प्रशासनाने अत्यंत या विषयात आम्ही काही करू शकत नाही, त्यासाठी ठेकेदाराचे पत्र लागेल, तुम्ही थेट पोलीस ठाण्यात तक्रार द्या, असे उत्तर दिल्याचे कामगारांनी सांगितले. यामुळे कामगारांनी नगरपालिका प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत पोलीस स्थानकात धाव घेतली. यावेळी कामगारांनी झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांसमोर कैफियत मांडल्यानंतर सदर ट्रॅक्टर चालकाने त्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे
दरम्यान, कंत्राटी कामगाराला मारहाण झाल्याचे कळताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्थानक व मालवण नगरपालिकेत धाव घेत कामगारांचे म्हणणे जाणून घेतले व मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी प्रशासन व पोलीसांकडे केली. तसेच याप्रकरणी मालवण नगरपरिषद प्रशासनाने जबाबदारी झटकल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता निरीक्षक श्री. पवार यांना जाब विचारत खडे बोल सुनावल्यानंतर श्री. पवार यांनी नगरपालिकेतर्फे पोलीसांना पत्र देऊन कामगाराला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजप महिला शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे आदी उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेबाबत स्वच्छता कामगारांनी मालवण पोलीस ठाणे व मालवण नगरपालिकेला निवेदन सादर करत कामगाराला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हा हल्ला केवळ एका कर्मचाऱ्यावरील नसून, संपूर्ण स्वच्छतादूतांच्या सन्मानावर आणि नगरपरिषदेच्या सेवेवरील थेट हल्ला आहे. या गंभीर घटनेनंतर आम्ही तातडीने नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्री. संजय पवार यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे या विषयात आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही थेट पोलीस ठाण्यात तक्रार द्या, असे सांगून आपली जबाबदारी झटकली. यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी नगरपालिकेचे अधिकृत पत्र आणण्याची अट घातली. या परिस्थितीत आम्ही ४० कर्मचारी ज्यांच्यावर संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे, त्यांनी नेमके काय करावे ? एका बाजूला मारहाण आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन व पोलीस यांच्यातील असंवेदनशील पत्र व्यवहारामुळे आमचे झालेले हाल अत्यंत क्लेशदायक आहेत. प्रशासनाचा हा थंड प्रतिसाद आम्हाला अत्यंत अपमानकारक वाटत आहे. या गंभीर परिस्थितीत आमच्या सहकाऱ्याला मारहाण करणाऱ्यावर तात्काळ पोलीस ठाण्यात व मालवण नगरपरिषदेत येऊन संबंधित चालकाची जाहीर माफी मागावी आणि भविष्यात असा प्रकार करणार नाही याचे लेखी आश्वासन द्यावे. अन्यथा प्रशासकीय यंत्रणेकडून योग्य तो सन्मान आणि ठोस कारवाईची हमी न मिळाल्यास आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड न करता उद्यापासून मालवण शहराच्या स्वच्छतेचे संपूर्ण कामबंद आंदोलन छेडत आहोत, यामुळे शहरातील कचरा समस्येची जी काही भीषण परिस्थिती निर्माण होईल, त्याची संपूर्ण जबाबदारी केवळ प्रशासन आणि संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर राहील, याची नोंद घ्यावी, असे कामगारांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, रात्री उशिरा संबंधिताने त्या चालकाची माफी मागून यापुढे आपण काही करणार नसल्याचे पोलिसांसमक्ष सांगितल्याने या प्रकरणावर पडदा पडला आहे


