कणकवली दि.१ मार्च(भगवान लोके)
दिगवळे गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह शनिवार २ ते ८ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हरिनाम सप्ताह कालावधीत दररोज अखंड हरिनाम व तीर्थप्रसाद, पहाटे ५ वाजता काकड आरती, सायंकाळी ७ वाजता हरिपाठ, रात्री ९ वाजल्यापासून नामांकित बुवांची संगीत व दिंडी भजने होणार आहेत.
श्री देव स्वयंभू मंदिर हे पुरातन मंदिर असून श्री शंकराचे एक जागृत
देवस्थान म्हणून ते ओळखले जाते. १२ व्या शतकात हे मंदिर प्रथम उभारल्याचा शिलालेख आहे. यावरुन हे देवस्थान सुमारे एक हजार वर्षे पूरातन असल्याचे समजते. पांडव वनवासात असताना त्यांनी या श्री स्वयंभूची आराधना केल्याचीही अख्यायिका आहे. या मंदिर परिसरात असलेली विहीर ही पांडवकालीन असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
अशा या इतिहासकालीन मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त शनिवार २ मार्च रोजी सकाळी १० वाजता घटस्थापना होणार आहे. त्यानंतर पुढील सात दिवस मंदिरात दररोज भजने, दिंड्या, चित्ररथ, पालखी, हरिपाठ आदी कार्यक्रम होणार आहेत. शनिवार ९ मार्च रोजी घटविसर्जन व समराधना होणार आहे. या हरिनाम सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वयंभू देवालय उत्सव कमिटी, सल्लागार कमिटी व दिगवळे ग्रामस्थांनी केले आहे.
दशावतारी नाट्य प्रयोग!
९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता श्री स्वयंभू मंदिरामध्ये घट विसर्जन,
दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद,
दुपारी ३.३० वाजता श्री महालक्ष्मी मंदिर येथे श्री सत्यनारायण महापूजा,
सायंकाली ६वाजता हरिपाठ (ज्ञानेश्वर सेवा मंडळ, दिगवळे), रात्री ७ वाजता सुस्वर भजन, रात्री ८ वाजता महाप्रसाद,
रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम,
रात्री ११ वाजता महालक्ष्मी क्रिडा मंडळ प्रस्तुत श्री महालक्ष्मी दशावतार नाट्यमंडळ, दिगवळे यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.