​सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांची बदनामी प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार

​राजकीय षडयंत्रातून खोडसाळ तक्रारीद्वारे बदनामी केल्याचा आरोप

​सावंतवाडी,दि.३० ऑक्टोंबर

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री. महेश रमेश सारंग यांनी त्यांची, त्यांच्या कुटुंबीयांची तसेच बँकेची बदनामी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. भालचंद्र विलास गवस नावाच्या व्यक्तीने निराधार आणि खोडसाळ माहितीद्वारे बदनामीकारक वृत्त वर्तमानपत्रात तसेच पीडीएफ स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे सारंग यांनी तक्रारीत म्हटले आहे.
​दिनांक २९ ऑक्टोबर रोजी भालचंद्र विलास गवस या व्यक्तीने मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ओरोस, सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीत वस्तूस्थितीला धरून नसलेली आणि विपर्यास करणारी माहिती नमूद करून सारंग आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे कर्जप्रकरण असल्याचे खोटे दावे करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

​’एक पैसाही देणे लागत नाही’ – सारंग यांचे स्पष्टीकरण
​श्री. महेश सारंग यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे की, “मी स्वतः अगर माझे कुटुंबीय आजमितीस सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक लि., सिंधुदुर्ग बँकेला कर्ज स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात एक पैसाही रक्कम देणे लागत नाही.” अशी वस्तुस्थिती असताना केवळ राजकीय द्वेषातून आणि आपले राजकीय जीवन खच्चीकरण करण्याच्या हेतूने हा खटाटोप करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
​आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकीय षडयंत्र रचले जात आहे आणि यामागे तक्रारदार तसेच आपले राजकीय विरोधक व शत्रू असल्याचा स्पष्ट संशय सारंग यांनी व्यक्त केला आहे.

​तक्रारदार बँकेचा सदस्य किंवा खातेदारही नाही:
​महेश सारंग यांनी पुढे असेही नमूद केले आहे की, ज्या व्यक्तीने जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली आहे, तो साधा सदस्य किंवा खातेदार सुध्दा सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँकेचा नाही. यावरून या कृत्यामागे राजकीय शक्ती आणि विघ्नसंतोषी लोकांचे पाठबळ असल्याचा त्यांचा दृढ विश्वास आहे.

​कठोर फौजदारी कारवाईची मागणी:
​सदर कृत्य हे समाज विघातक असून सामाजिक तेढ निर्माण करणारे तसेच आपली व बँकेची बदनामी करणारे असल्याने, सारंग यांनी पोलिसांकडे कठोर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. पूर्ण पत्त्यानिशी तक्रार दाखल न करणाऱ्या भालचंद्र विलास गवस या व्यक्तीचा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या शक्तींचा तातडीने शोध घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
​तसेच, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राकडून (NIC) अर्जासोबत जोडलेल्या सातबारावरील Verification ID नुसार माहिती घेऊन बदनामीकारक वृत्त वर्तमानपत्रात व पीडीएफ फाईलद्वारे सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.