वेंगुर्ला ,दि .१ मार्च
वेंगुर्ला शाळा नं.४ला शासनाकडून वेगवेगळ्या सुमारे ५०५ लहान मोठे वैज्ञानिक प्रयोग असलेल्या साहित्याची ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी ईनोवेशन लॅब‘ मंजूर झाली आहे. याचे उद्घाटन राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव उर्फ बाळा परब यांच्या हस्ते शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
वेंगुर्ला शाळा नं.४ या शाळेतील प्रगती लक्षात घेता शासनाकडून ही अध्ययावत अशी लॅब विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक गुणांना वाव मिळण्यासाठी मंजूर केली आहे. आज या लॅबचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वेदांत नाईक व वेद वेंगुर्लेकर यांच्या प्रतिकृतीला प्रथम, भूमिका असनकर द्वितीय तर हंसिका वजराटकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तर विज्ञान थीम असलेल्या रांगोळी स्पर्धेत तनिष्का जाधव हिने प्रथम, चिन्मयी किनळेकर हिने द्वितीय, श्रेया किनळेकर हीने तृतीय तर चिन्मयी परब व हंसिका वजराटकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष परब यांनी तर प्रास्ताविक सुनंदा खंडागळे आणि आभार मुख्याध्यापक संध्या बेहरे यांनी मानले.