बांदा,दि.५ नोव्हेंबर
दीपावलीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने चौदा वर्षाखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बांदा शहर मर्यादित पर्यावरणपूरक आकाश कंदिल स्पर्धेत खेमराज मेमोरियल प्रशालेचा विद्यार्थी नैतिक मोरजकर याने प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कंदिल पर्यावरणपूरक साहित्य वापरून स्पर्धकांनी स्वतः तयार केले होते. स्पर्धेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध कल्पक आणि आकर्षक आकाश कंदिलांमध्ये नैतिक मोरजकर याने माडाची झावळे व बांबूच्या काठ्या वापरून बनवलेला देखणा कंदिल सर्वांचे लक्ष वेधून घेत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या नैतिकला प्रकाश पाणदरे पुरस्कृत रोख रुपये एक हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम चौक, बांदा कट्टा कॉर्नर येथे संपन्न होणार आहे. या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धक बालकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


