स्मारक परिसर सुशोभीकरणासाठी १५ लाख निधी देणार…! आम राजेश पाटील
दोडामार्ग, दि. १ मार्च
सिंधुदुर्ग कोल्हापूर सीमेवर वसलेल्या
चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड वर नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र तथा किल्ल्याचे पहिले किल्लेदार रायबा ऊर्फ रायाजी मालुसरे यांचा जगातील पहिला पुतळा व स्मारकाचे उद्घाटन काल दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी अपूर्व उत्साहात पार पडले. दुर्गप्रेमी, शिवभक्त तसेच मालुसरे कुटुंबीयांच्या देणगी व परिश्रमातून हे स्मारक उभारण्यात आले आहे.
सकाळी स्मारक स्थळापासून छ. शिवरायांच्या प्रतिमेची भवानी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सदर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर ते परत स्मारक स्थळ अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तानाजी मालुसरे तथा रायबा मालुसरे यांचे वंशज तसेच कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या सरदार घराण्यातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव मोहिते, सरदार कमळोजी साळुंखे यांचे वंशज सुहास दादा साळुंखे, तानाजी यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांचे वंशज अनिल मालुसरे, गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे वंशज दादाराम नाईक, सरदार बालाजी डुबल यांचे वंशज रघुनाथदादा डुबल आदींनी छत्रपतींची पालखी वाहिली.