सावंतवाडी दि.१ मार्च
सावंतवाडी शहरातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक घालण्यात आले आहेत त्याविरोधात अॅटो रिक्षा चालक मालक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सावंतवाडी शहरात जुन्या मुंबई गोवा महामार्गावर शिवाजी चौक, बापूसाहेब महाराज पुतळ्याजवळ व तीन मुशी उपजिल्हा रुग्णालय नजीक सार्वजनिक बांधकाम खात्याकडून घातलेले १२ ते १५ स्पीडब्रेकर्स अत्यंत धोकादायक आहेत, याकडे सार्वजनिक बांधकाम, नगरपरिषद मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांचे अॅटो रिक्षा चालक मालक संघटनेने निवेदन देऊन लक्ष वेधले आहे
गतिरोधक बसविल्यापासून गेल्या आठ दिवसात एस.टी.बसेसच्या चाकाचे नट तुटणे, रिक्षांच्या एक्सेल बाहेर पडणे, पुढील काचा सुटून पडणे व आतील बसलेल्या प्रवाशांना हादरे बसून त्यांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. ते जर काढले नाही तर भविष्यात मोठा अपघात होण्याची भिती आहे व तसे झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहिल. त्यामुळे एक दोन स्पीड ब्रेकर्स ठेवून बाकीचे सर्व काढून टाकावेत न पेक्षा नाईलाजास्तव आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल असा इशारा अॅटो रिक्षा चालक मालक संघटनेने निवेदन देऊन दिला आहे. यावेळी जिल्हा रिक्षा सरचिटणीस सुधीर पराडकर, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र सावंत, सदानंद धर्णे, व मान्यवर उपस्थित होते. येत्या आठ दिवसांत गतिरोधक संकट दूर केले नाही तर रिक्षा चालक मालक संघटनेने पदाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडणार आहेत असा इशारा दिला आहे.