सावंतवाडी दि.७ नोव्हेंबर
शिरोडा येथील र.ग. खटखटे ग्रंथालयात सातवी व आठवीसाठी नियमित शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सदर वर्ग पूर्णतः विनामूल्य असून आजगाव येथील ‘पू.गोगटे गुरुजी प्रतिष्ठान’ मार्फत घेण्यात येणार आहेत. नुकतेच या वर्गाचे उद्घाटन प्रतिष्ठानच्या गतवर्षीचा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी रोहित आसोलकर याचे हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
विद्यार्थी व पालक यांच्यासाठी आयोजित केलेल्या खास सभेत प्रथम खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी प्रास्ताविक केले. नंतर प्रतिष्ठानचे समन्वयक विनय सौदागर यांनी क्लास विषयी विस्तृत स्वरुपात माहिती दिली व पालकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी गोगटे प्रतिष्ठानचे मार्गदर्शन घेऊन गतवर्षी आठवीच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या रोहित अजित आसोलकर याचा रोख दीड हजार रुपये व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ सदस्या श्रीमती सरोज रेडकर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या, तर आभार ग्रंथालयाचे संचालक डाॅ. श्रीराम दीक्षित यानी मानले. या कार्यक्रमास ग्रंथपाल प्राची पालयेकर, अनिष्का रगजी तसेच प्रतिष्ठानचे दिलीप पांढरे, अविनाश जोशी, एकनाथ शेटकर आदी उपस्थित होते. हे मार्गदर्शन वर्ग परीक्षा होईस्तोवर सलग चार महिने चालणार आहेत.


