देवगड,दि.८ नोव्हेंबर
शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी नसावे. जीवनाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी काय केले पाहिजे, याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. आपण जे शिकतो, ते आपल्याला वापरता येत नाही आणि आपण जे वापरतो, ते आपल्याला कोणी शिकवत नाही. त्यामुळे पारंपरिक शिक्षण घेताना याचाही विचार होणे आवश्यक आहे. केवळ बौद्धिकतेमुळे विकास होतो या व्यसनातून आपण बाहेर पडत नाही, तोपर्यंत विकासाची व कौशल्याची दारे आपल्यासाठी उघडणार नाहीत. ही कौशल्याची दारे आजपासून उघडली जायला हवीत. तसेच कौशल्य आधारीत अभ्यासक्रमात रसग्रहण करता आले पाहिजे, असे मत भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झारापचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी जामसंडे येथे व्यक्त केले.
विद्या विकास मंडळ संचलित जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर येथे आठवी व नववीच्या वर्गासाठी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये पुणे येथील ‘कॉज टू कनेक्ट फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत बहुविध कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या नलावडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. देवधर बोलत होते. व्यासपीठावर विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. अजित गोगटे, ‘कॉज टू कनेक्ट’ फाऊंडेशनचे संस्थापक व संचालक अनिरुद्ध बनसोड, विद्या विकास मंडळाचे सचिव प्रवीण जोग, शाळा समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर, प्रकाश गोगटे, प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव, अॅड. अभिषेक गोगटे आदी उपस्थित होते.
डॉ. देवधर पुढे म्हणाले, विज्ञान म्हणजे अशक्यतेकडून शक्यतेकडचा प्रवास आहे. आजच्या युवा पिढीने विज्ञान म्हणजे काय? तंत्रज्ञान म्हणजे काय? याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. धर्माचा उन्माद करून देशाची प -गती होऊ शकत नाही. जपान, जर्मनी या देशांकडे नैसर्गिक साधनसंपत्ती सगळ्यात कमी असतानाही विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे या देशांनी प्रगती केली आहे. त्यामुळे धर्माचा उदोउदो न करता विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरून आपण आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पु. ल. देशपांडेचा चितळे मास्तर सध्या कुठे सापडत नाही. जेथे शिक्षक सापडतो, तेथे भगीरथ काम करीत आहेत. आपल्याला पुन्हा तो चितळे मास्तर जागा करायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
अनिरुद्ध बनसोड यांनी विद्या विकास मंडळामार्फत सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. विद्या विकास मंडळ या संस्थेचे कामकाज गतीमान असल्याने या संस्थेची शैक्षणिक प्रगती उत्तरोत्तर होत राहील. या संस्थेच्या प – शालेत राबविण्यात येणारा बहुविध कौशल्य अभ्यासक्रम हा देशव्यापी अभ्यासक्रम असून यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे. जगप्रसिद्ध हापूस आंब्याच्या देवगड- जामसंडे शहराच्या या पवित्र जागेत कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मिळालेल्या मानसन्मानाने आपण भारावून गेलो आहोत, असे त्यांनी सांगितले. यावेळी अॅड. अजित गोगटे, प्रकाश गोगटे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, न. पं. चे स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले, दयानंद पाटील यांच्यासह विविध मान्यवर व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील जाधव यांनी केले.


