कष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊदे !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; आई भराडी देवीचे घेतले आशीर्वाद…

मालवण,दि.२ मार्च (प्रफुल्ल देसाई)
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई पुणे आणि नागपूर मुंबई या धर्तीवर मुंबई-सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार असून त्यामुळे या भागात येणाऱ्या जनतेचा वेळ वाचेल याशिवाय इथले पर्यटन उद्योग वाढीस लागतील जेणे करून या भागात रोजगार उपलब्ध होईल असे सांगतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील विकासासाठी आपले सरकार कमी पडणार नाही अभिवचन त्यांनी यावेळी दिले

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी दर्शन घेतले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव तसेच राज्यातील बळीराजावर ओढवलेलं अवकाळी पावसाचे संकट दूर कर असं मागणे आपण देवी जवळ मांडल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरीही दरवर्षी न चुकता अंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो. आज माझं सौभाग्य की मला आई भराडीदेवीचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर ‘कोकण विकास प्राधिकरण’ स्थापन केले असून या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील. तसेच कोकणातील नद्यातून वाहून जाणारे पाणी बंधारे बांधून अडवण्याची गरज आहे, शक्य तिथे असे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

आंगणेवाडीतील या आई भराडीदेवीच्या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. त्यांच्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी नक्की देण्यात येईल, त्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी किशोर तावडे आदी उपस्थित होते. यावेळी दैनिक रत्नागिरी टाइम्सने काढलेल्या आंगणेवाडी यात्रा स्पेशल पूरवणीचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते झाला