वेंगुर्ला,दि.२ मार्च
चिपी-कोरजाई, गाडेधाववाडी येथील गणेश मंदिर शेजारी असलेले अनधिकृत वाळूचे तीन रॅम्प शुक्रवारी तहसीलदार ओंकार ओतारी यांनी महसूल आणि निवती पोलीस यांच्या पथकासमवेत जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केले. वेंगुर्ला तालुक्यात चोरट्या वाळू विरोधातील रॅम्प उध्वस्त करण्याची ही महसूलची पहिलीच मोठी कारवाई आहे. त्यामुळे अनधिकृत वाळू व्यवसाय करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
या भागात अनधिकृत वाळू उपसा आणि कांदळवनांची तोड झाल्याच्या तक्रारी वेंगुर्ल तहसील कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे महसूल विभाग याठिकाणी शुक्रवारी धडक देत चोख कार्यक्रम केला. या मोहिमेमध्ये तहसीलदार ओंकार ओतारी यांच्यासह महसूल नायब तहसीलदार अभिजित हजारे, वन विभागाचे अधिकारी सूर्यकांत सावंत व सावळा कांबळे, बंदर निरिक्षक मालवण अनंत गोसावी, मंडल अधिकारी अजय कांबळी, श्री. निग्रे, तलाठी वेतुरकर, डवरे, पास्ते, पोलीस पाटील श्री.पेडणेकर, परुळे कोतवाल श्री.घाडी आणि निवती पोलीस या पथकाने ही कारवाई केली.