वन अनिर्णित जमिनीवर उभारण्यात आलेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस मिळाल्यापासून ४८ तासात अतिक्रमणे हटवावीत


सावंतवाडी,दि.२ मार्च 
आंबोली हिरण्यकेशी येथे वन अनिर्णित जमिनीवर उभारण्यात आलेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस मिळाल्यापासून ४८ तासात अतिक्रमणे हटवावीत ,अशी नोटीस उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी जारी केली आहे. अन्यथा वन विभागाला कारवाई करावी लागेल असे म्हटले आहे तसेच वनरक्षक व वनपाल यांची तडकाफडकी बदली करत विभागीय चौकशीचे आदेश उपवनसंरक्षक यांनी दिले आहेत.
आंबोली येथे कबुलायतदार गावकर जमीन व वनखात्याची अनिर्णित जमीन आहे. सरकारने कबुलायतदार गावकर शासन जमीन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वनखात्याची अनिर्णित जमीन वाटप करण्याबाबत सरकारचा कोणत्याही निर्णय झालेला नाही. दरम्यानच्या काळात वन- अनिर्णित जमिनीवर २७ बंगले उभे राहिल्याच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी हिरण्यकेशी येथे गेल्या १६ दिवसापासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खासदार विनायक राऊत, मनसे, आदी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेटी देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. वनखात्याच्या अनिर्णित जमिनीवर अतिक्रमणे झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याने उपवनसंरक्षक व महसूल विभागाने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर वीज मंडळाने दिलेले वीज मीटर देखील कट केले असून महसूल खात्याची कारवाई प्रलंबित आहे. मात्र वनखात्याने कारवाई सुरू केली आहे.

आंबोली वनरक्षक आणि वनपाल यांच्या बदलीचे तडका फडकी आदेश उप वनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्याकडून देण्यात आले आहेत.तसेच त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.वनरक्षक पांडुरंग गाडेकर याची कडावल येथे बदली करण्यात आली आहे.तर वनपाल पूनम घाडगे यांची कुडाळ येथे बदली करण्यात आली आहे. त्यांची विभागीय चौकशी होणार आहे.तसेच अतिक्रमण प्रकरणी चौकशी सुरू आहे, असे वन विभागाने म्हटले आहे.

उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, वनपाल व वनरक्षक यांची बदली करून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे तसेच जी अतिक्रमणे झाली आहेत .त्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.ही नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत अतिक्रमणे दूर करावीत असे या नोटिसीत म्हटले आहे. अन्यथा त्यावर वनखाते कारवाई करेल.