वेंगुर्ला, दि.०४ मार्च
कथानिर्मिती प्रक्रिया ही मनाच्या अनेक पातळ्यांवर घडत असते. ती काहीशी गूढ असते. जीवनानुभव घेत असताना एखाद्या तरल क्षणी संभाव्य कथाबीजाची निर्मिती होते. एखाद्या बीमध्ये पाने, फुले, फळे, फांद्या यांसह वृक्षाचा आकार लपलेला असावा त्याप्रमाणे कथाबीजामध्ये कथाविस्तार लपलेला असतो. बीजधारणेपासून संपूर्ण कथेची निर्मिती होईपर्यंतचा प्रवास हा दीर्घ असून त्यात अनेक टप्पे असतात. उत्स्फूर्तता आणि जाणीवयुक्तता यांचा मिलाफ असतो. कथालेखनासाठी आवश्यक असलेल्या एखाद्या कौशल्याचा जरी अभाव असेल तरीही कथा परिणामकारक होत नाही, असे प्रतिपादन कथानिर्मिती प्रक्रिया या विषयावर बोलताना प्रसिद्ध कथा व कादंबरीकार वृंदा कांबळी यांनी केले.
राजापूर लांजा नागरी सेवा संघ मुंबई यांनी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले होते. लांजा तालुक्यातील शिपोशी येथील न्या.वै.वा.आठले विद्यालयाच्या भव्य प्रांगणात भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, उद्घाटक पितांबरी उद्योग समुहाचे प्रमुख रविद्र देसाई हे होते. राजापूर लांजा नागरी सेवा संघाचे अध्यक्ष गीतकार सुभाष लाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सौ.कांबळी यांचा सत्कार करण्यात आला.