संशयित आरोपी नफीस गौस पाटणकर यांच्या विरोधात गुन्हा ; नांदगाव – तोंडवली बोभाटेवाडी येथील घटना
कणकवली दि.३ मार्च(भगवान लोके)
कणकवली तालुक्यातील तोंडवली बोभाटेवाडी येथील आपल्या काजूच्या बागेमध्ये गाय व वासरु गेल्याचा राग आल्याने आरोपीने आकडीतील कोयत्याने गाय व वासरु यांच्या पायावर मारत दुखापत केली.ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता घडली.याप्रकरणी संशयित आरोपी नफीस गौस पाटणकर (वय -२९, रा.नांदगाव मुस्लिमवाडी)
यांच्या विरोधात भादवी कलम ४२९,प्राणी अधिनियम ११(१)(१), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११९ अन्वये कणकवली पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत असे की, फिर्यादी विशाल विलास मेस्त्री(रा.तोंडवली बोभाटेवाडी ) यांची गाय आणि वासरु शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास संशयित आरोपी नफीस गौस पाटणकर यांच्या तोंडवली येथील बागेत गेली होती. त्यामुळे आरोपीने गाय व तिचे वासरु बागेत आल्याच्या रागातून दोघांच्याही पायावर कोयत्याने मारत गंभीर दुखापत केली होती. याबाबत माहिती विशाल मेस्त्री यांना मिळताच त्यांनी पोलिस पाटील विजय मोरये व गावातील ग्रामस्थांना कळवले. फिर्यादी श्री.मेस्त्री यांनी संबंधित आरोपीच्या काजू बागेत जाऊन गाईला पाहिले असता गाय आणि वासरु चालत नव्हते,त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत होते. त्याबाबत गायमालक फिर्यादी श्री.मेस्त्री यांनी संशयित आरोपी नफीस गौस पाटणकर विचारणा केली असता ‘तुझी गुरे माझ्या काजू बागेत घुसून नुकसान करतात’ आजही माझ्या काजू बागेत आहेत.त्यामुळे माझ्या आकडीतील कोयत्याने त्या गाईवर मी मारले आहे, अशी पोलिस पाटील श्री. मोरये यांच्या समक्ष त्याने कबुली दिली, असे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नफीस गौस पाटणकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान,कणकवली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून शनिवारी सायंकाळी घटनास्थळी धाव घेऊन गाय मालक यांना पोलिस ठाण्यात बोलावले होते.तसेच संशयित आरोपी नफीस गौस पाटणकर याला ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा याप्रकरणी गायमालकाची फिर्याद दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक कणकवली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलिस उपनिरीक्षक रविंद्र शेगडे करीत आहेत.